Give notice to illegal constructions in the city
शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये बेकायदा बांधकामे सुरू आहेत. जो परवानगी न घेता बांधकाम करेल, त्याच्याविरोधात तातडीने कारवाई करा, त्यासोबतच बेकायदा बांधकामे शोधून त्यांना नोटीस द्या, असे आदेश गुरुवारी (दि.२८) महापालिकेच्या आढावा बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी सर्व १० झोन कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले.
शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणारी बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी बेकायदा बांधकामांकडे वक्रदृष्टी केली आहे. परवानगी न घेता अनेक जण बांधकाम करतात. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडतो. बेकायदा बांधकाम करून मालमत्ताधारक महापालिकेच्या सर्व सेवांचा लाभ घेतात.
त्यामुळे आता अशा बेकायदा बांधकामांवर प्रत्येक झोन कार्यालयाने लक्ष ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रशासकांनी दिले. त्यासोबतच ज्या ज्या झोन कार्यालयाअंतर्गत येणार्या भागांमध्ये गुंठेवारी वसाहती आहेत, त्या वसाहतींतील बेकायदा बांधकामांचा शोध घेऊन नोटीस बजावणे आणि त्यांना गुंठेवारीनुसार मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी सूचना करणे, तसेच गुंठेवारी न केल्यास कारवाईचेही आदेश प्रशासकांनी या बैठकीत दिले आहेत. दरम्यान, शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये गुंठेवारीचे कॅम्प लावण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.
शहर विकास आराखड्यातील मंजूर ३६, २४, १८ मीटरच्या सर्व रस्त्यांची यादी तयार करून या रस्त्यांचे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात यावा, असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले. ज्या भागातील रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्व्हे होईल, त्याच भागात गुंठेवारीचे कॅम्प लावण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
गुंठेवारीचे प्रमाणपत्र नसलेल्यांना बँकांनी कर्ज देऊ नये, यासाठी महापालिका शहरातील सर्व बँकांशी पत्रव्यवहार करणार आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांचाही समावेश आहे.