Beware! Dengue outbreak in the Sambhajinagar city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे १०१ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८८ संशयित तर १३ जणांना लागण झाल्याचे मनपा आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पावसाळी वातावरणामुळे डासांचा उपद्रव वाढल्याने साथींच्या आज-ाराचाही फैलाव झाला असून, घरा-घरांत ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही जून आणि जुलै महिन्यात शहरात अल्पप्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात फारसा बदल झाला नव्हता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. दैनंदिन होत असलेल्या पावसामुळे वातावरण बदलले. कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे तापमानात घट झाली नाही. त्यामुळे घराघरांत साथीच्या आजारांचा फैलाव झाल्याने ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत.
या साथीच्या आजारासोबतच डेंग्यूचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे महापालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. पावसामुळे डासांचा उपद्रव वाढला असून, डेंग्यूचे १०१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ८८ रुग्ण हे डेंग्यूसदृष्य असून, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १३ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना चाचणी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच चिकुनगुणिया आजारानेही डोके वर काढले असून, या आजाराचे संशयित २ तर पॉझिटिव्ह ३ रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने बैठक घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डेंग्यूसह साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.