Give bonuses to municipal employees and contract workers on the occasion of Diwali!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सणाला अवघा एक आठवडा उरला असताना महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बोनस आणि सणानिमित्त इतर सुविधांची जोरदार मागणी करण्यात आली आहे. विविध कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे मागण्यांचा पाऊस पाडला असून, बोनसपासून ते आरोग्य तपासणीपर्यंत अनेक मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत.
दिवाळी सणानिमित्त महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस २० हजार रुपये, तसेच फेस्टिव्हल अॅडव्हान्स ३० हजार रुपये देण्याची मागणी कृष्णा बनकर यांच्या बहुजन शक्ती कामगार संघटनेने केली आहे. यासोबतच सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवसांचा मोबदला रोखीने अदा करावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सर्व देयके देण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच दर तीन महिन्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी, ड्रेसकोड आणि नेमप्लेट सक्तीची करण्यात यावी, तसेच हजेरी केंद्र बांधून द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच महाराष्ट्र दर्शन योजना पुन्हा सुरू करावी, ४५ वर्षांवरील सफाई कर्मचाऱ्यांना हलके काम देण्यात यावे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संजय रगडे यांच्या बहुजन कामगार शक्ती महासंघाने कायम कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दराने बोनस देण्याची मागणी केली आहे.
तसेच कायम कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये फेस्टिव्हल अॅडव्हान्स, सफाई कर्मचाऱ्यांना निवासाची सोय, सुटीचे पैसे तत्काळ अदा करणे, व आकृतिबंधानुसार मुकादम पदावर पदोन्नती देणे, अशा मागण्या महासंघाने केल्या आहेत. महासंघाने ज्येष्ठतेनुसार उपायुक्तांपासून लिपिक पदापर्यंत पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशीही मागणी प्रशासनाकडे केली आहे.