Sambhajinagar Crime : मुलींचा क्लासमधील वाद; दाम्पत्याला अमानुष मारहाण, पोलिसाच्या भावाचा प्रताप  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : मुलींचा क्लासमधील वाद; दाम्पत्याला अमानुष मारहाण, पोलिसाच्या भावाचा प्रताप

जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

Girls' class argument; Couple brutally beaten up by policeman's brother

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुझ्या मुलीने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केले आहे, असे म्हणत चौघांनी घरात घुसून दाम्पत्याला लाठ्या-काठ्यांसह रॉडने अमानुषपणे बेदम मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास सातारा परिसरात घडली. संदीप लंके, त्याची पत्नी आणि अनोळखी दोन, अशी आरोपींची नावे आहेत.

सातारा परिसरातील ४५ वर्षीय समीर (काल्पनिक नाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी मुलगी गोपाल टी जवळील एका क्लासमध्ये शिकते. त्याच क्लासमध्ये आरोपी संदीप लंकेची मुलगी आहे. क्लासमध्ये त्या दोघींचा वाद झाला. तेव्हा शिक्षकांनी दोघींमध्ये समझोता करून वाद मिटविला.

तेथे दोघीही एकमेकींना स्वॉरी म्हणाल्या होत्या. मात्र हे प्रकरण लंकेला समजल्यावर त्याने समीर यांचे सातारा परिसरातील घर आणि नागेश्वरवाडीतील दुकानाचा पत्ता शोधून दुकानावर गेला. तेथे त्याने तुझी मुलगी कुठे आहे, तिला बाहेर बोलव, तिला मारायचे आहे, असे म्हणून गोंधळ घातला. तेव्हा समीर यांच्या वडिलांनी लंकेला समजावून सांगितले. तेव्हा लंकेने माझा भाऊ पीआय आहे, असे म्हणत फोन लावला. तेव्हा समीर त्याच्या भावाशी बोलले होते. तरीही संदीप लंके हा तुला आणि तुझ्या मुलीला बघून घेतो, अशी धमकी देत निघून गेला होता. पुन्हा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आरोपी संदीप लंके, त्याची पत्नी आणि अनोळखी दोघे, असे चार जण दांडे, रॉड घेऊन समीर यांच्या घरात शिरले. आरडाओरड करीत त्यांनी समीर यांना बेदम मारहाण सुरू केली.

पायावर नाक घासून मागायला लावली माफी

ओढत घराबाहेर काढले. तोंड, हात आणि पायावर रॉडने मारून जखमी केले. हा गोंधळ ऐकूण समीर यांची पत्नी मध्यस्थीसाठी धावली. लंकेच्या पत्नीने त्यांनाही मारहाण केली. नाक, डोळ्यावर ठोसे मारले. दांड्याने मारहाण केली. लंकेने पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावली. अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केला. समीर यांची पत्नी दार उघडून शेजाऱ्याच्या घरात पळाली. तिने नातेवाइकांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर डायल ११२ ला कॉल करून कळविण्यात आले.

पोलिसालाच दिली धमकी

डायल ११२ ला कॉल केल्यावर पोलिस अंमलदार विष्णू वाघ दोन पोलिसांसह समीर यांच्या घरी गेले. तेव्हा आरोपी लंके आणि त्याचे साथीदार तिथेच होते. त्याला मारहाणीबद्दल विचारले असता त्याने होय, आम्हीच त्यांना मारहाण केली. माझे नाव संदीप लंके आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, माझा भाऊ पीआय आहे, असे बोलून गोंधळ घातला. याप्रकरणी चौघांविरुद्ध घरात घुसणे, मारहाण करणे, विनयभंगासह अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT