Khandoba Temple : येळकोट येळकोट जय मल्हार... File Photo
छत्रपती संभाजीनगर

Khandoba Temple : येळकोट येळकोट जय मल्हार...खंडोबा मंदिरात घटस्थापना उत्साहात

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Ghatsthapana is celebrated with enthusiasm at Khandoba temple, a crowd of devotees gathers for darshan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : येळकोट येळकोट जय मल्हार... च्या गजरात शहरातील सातारा येथील खंडोबा मंदिरात मार्तंड भैरव (खंडोबा) पडर-ात्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहाटे चार वाजता मंदिरातील खंडोबा मूर्तीवर रुद्राभिषेक करून मूर्तीला नवीन वस्त्रे नेसविण्यात आली. विड्यांच्या पानावर घटस्थापना करून पेढ्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. मंदिराचे पुजारी दिलीप धुमाळ यांच्या हस्ते महाआरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.

देवदीपावली म्हणून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला मार्तंड भैरव (खंडोबा) षडरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पहाटे चार वाजता ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत मंदिराचे पुजारी दिलीप धुमाळ, विशाल धुमाळ, विक्रम धुमाळ यांच्या हस्ते खंडोबा मुर्तीला रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर अखंड नंदादीप लावून विड्यांच्या पानावर घटस्थापना करण्यात आली.

पेढयाचा नैवेद्य दाखवून महाआरती करून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर, विश्वस्त सोमिनाथ शिराणे, सुखदेव बनगर यांची उपस्थिती होती. खंडोबा देवस्थान विश्वस्त समितीने जय्यत तयारी केली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता केली असून, भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.

जागरण गोंधळ घालण्यासाठी वाघ्या-मुरळीसाठीही मंदिर परिसरात स्वतंत्र व्यवस्था करून दिली. शुक्रवारपासून मंदिरात 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष सुरू झाला आहे. सकाळपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. भाविकांकडून रेवडी, हळदीच्या भंडाऱ्याची उधळण केली जात होती. येळकोट येळकोट जय मल्हार, मल्हारी मार्तंड की जय, असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत होते. घराघरांतही खंडोबा षड्रात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, खंडोबाची घटस्थापना करण्यात आली. दररोज मंदिरात भजन, कीर्तन हे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT