झडतीमध्ये अर्धा किलोहून जास्त सोने अन् 19.75 लाख रोकड जप्त Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

महावितरणचा कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडेच्या घरात घबाड

ठाणे, कन्नडमध्ये घरझडती : अर्धा किलोहून जास्त सोने अन् 19.75 लाख रोकड जप्त

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एक लाखांची लाच घेताना पकडलेला कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे याच्या कन्नड आणि ठाणे येथील घरात मोठे घबाड सापडले. कन्नडच्या घरात १ लाख ६२ हजार रुपये रोकड आणि ठाण्याच्या घरात ५३ तोळे (अर्धा किलोहून जास्त) सोने आणि १८ लाख १३ हजार रुपये रोकड, दोन फ्लॅट व एका लॉकरचे कागदपत्र आढळले, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, रोहित्रांच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर या दोघांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील दीड लाख रुपये घेऊन त्यांनी चारपैकी दोन कामांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर उर्वरित दोन कामांच्या मंजुरीसाठी पुन्हा दोन लाख रुपयांची लाच रामगुडे आणि दिवेकर यांनी मागितली. त्यामुळे ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी १० जुलैला दोघांनाही एक लाख रुपये लाच घेताना त्यांच्या केबिनमध्येच अटक केली होती.

या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा यशस्वी होताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींच्या घरांचे पत्ता मिळविला. कार्यकारी अभियंता रामगुडे याचे कन्नडमध्ये राहते घर आणि ठाण्यात स्वत:च्या मालकीचे कुटुंबिय राहात असलेले एक असल्याचे समोर आले. छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने कन्नडच्या घराची झडती घेतली तर ठाणे येथे असलेल्या घराची झडती घेण्यासाठी ठाणे एसीबीशी संपर्क साधला. दोन्ही ठिकाणी एकाचवेळी घरझडती घेण्यात आली. दरम्यान, दिवेकरच्या घरात मात्र विशेष काही सापडले नाही, असे आटोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT