उद्योगनगरीत वाढतेय घुसखोरी; बनावट आधार कार्ड सापडले

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 बांगलादेशींना केली अटक
Infiltrating workers in industrial areas near Pune
पुणे लगत उद्योग क्षेत्रात घुसखोर कामगार File Photo
संतोष शिंदे

पिंपरी : उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या घुसखोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. आयुक्तालय स्थापनेपासून पाच वर्षात केवळ 3 बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. मात्र, मागील सहा महिन्यांत तब्बल 16 बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये दोन बांगलादेशी महिलांचादेखील समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर सापडल्याने गोपनीय यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.

बनावट आधारकार्ड सापडले

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मागील सहा महिन्यांत भोसरी, भोसरी एमआयडीसी, महाळुंगे, चाकण परिसरातून 16 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. बांगलादेशी नागरिक बनावट आधारकार्ड बनवून या ठिकाणी वास्तव्यास होते. रोजगारासाठी हे नागरिक भारतात आले असले तरी त्यांच्याकडे वास्तव्य करण्याची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. तसेच, या नागिरकांनी आपली खरी ओळखही लपवल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी नागरिकांनी कागदपत्रे कोठे बनवली. पिंपरी-चिंचवड शहरात येण्याचा त्यांचा नेमका उद्देश काय, याबाबत तपास सुरू आहे.

Infiltrating workers in industrial areas near Pune
घुसखोर जाहले उदंड!

सारा मामला मजुरीसाठी

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये अंगमेहनतीचे काम करण्यासाठी स्थानिक तसेच राज्यातील कामगार तयार होत नाहीत. त्यासाठी परप्रांतीयांना प्राधान्य दिले जाते. बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमध्येदेखील परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. यातील काही जण ओळख लपवून वास्तव्य करतात. तसेच, काही जण बनावट ओळखपत्र व इतर बनावट कागदपत्रे तयार करून राहत असल्याचे वेळोवेळी लेबर कॅम्पमधील मजुरांची नोंद किंवा पोलिसांना माहिती दिली जात नाही.

कंपन्या व कारखान्यांतील व इतर आस्थापनांतील कर्मचारी, कामगार, मजूर यांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, चारित्र्य पडताळणी करण्याबाबत उदासीनता आहे. तसेच घर भाडेतत्त्वार देताना भाडेकरार केला जात नाही. त्यामुळे गुन्हेगार, चोरटे, तसेच परदेशी नागरिकांचे फावते. त्यांना कामगार, मजूर म्हणून ओळख लपवून शहरात वास्तव्य करता येते. यातच घुसखोरही शहरात सहजपणे राहू लागले आहेत.

वेश्या व्यवसायासाठी घुसखोरी

बांगलादेशी घुसखोरांमध्ये महिलादेखील मोठ्या संख्येने आहेत. यातील काही घुसखोर महिला भारतात देहविक्री करतात. मोशी येथून अटक केलेल्या दोन महिला देहविक्रीसाठी देशातील काही शहरांमध्ये अनेक दिवस वास्तव्य करून देहविक्री करत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. तसेच, एक महिला कर्नाटकमध्ये वेश्याव्यवसाय करताना मिळून आली होती.

वेळीच धोका ओळखण्याची गरज

पुणे परिसरात काही बांगलादेशी घुरखोरांना अटक करण्यात आली होती. यामध्ये बांगलादेशी यंत्रणांकडील एक ‘वाँटेड’ घुसखोर असल्याचे समोर आले. त्यामुळे खळबळ उडाली होती.

घुसखोरांसोबत शत्रू राष्ट्रांचे दहशतवादी प्रवेश करून देशविघातक कृत्य करू शकतात. त्यामुळे शहरवासीयांनी वेळीच धोका ओळखून संशयित व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी शाखेच्या माध्यमातून शहरात नेहमी कोंबिंग ऑपरेशन सुरू असते. बाहेरील राज्यातून विशेषता पश्चिम बंगालमधून येणार्‍या नागरिकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. त्याद्वारे बांगलादेशातून कोणी नागरिक खोटे ओळखपत्र तयार करून भारतात राहत आहे का, याची शहानिशा केली जाते. मागील सहा महिन्यांत 16 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी बाहेरील राज्यातील नागरिकांना काम देताना तसेच, घर भाड्याने देताना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे.

संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news