गेवराई ( छत्रपती संभाजीनगर ) : गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशीच भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये मोठी हाणामारी आणि दगडफेक झाली. या शाब्दिक वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने गेवराई शहरात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाला सुरुवात झाली असताना, भाजपच्या उमेदवार गीता त्र्यंबक उर्फ बाळराजे पवार या प्रभाग क्रमांक दहामधील मतदान केंद्रावर आल्या. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित समोरासमोर आले. यावेळी पृथ्वीराज पंडित यांनी भाजपच्या उमेदवार गीता पवार यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने टाळ्या वाजवल्या. याचा जाब गीता पवार यांनी विचारताच, दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली. या वादाचे पडसाद त्वरित शहरात उमटले.
दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांच्या बंगल्यांवर चाल करून जाण्याच्या प्रयत्नात होते. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील एका गाडीवर पंडित समर्थकाने दगड घालून ती फोडली. अंगावर धावून गेले. यानंतर स्वतः लक्ष्मण पवार हे पंडित समर्थकांच्या यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि एकच पळापळ उडाली. रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस स्वतःहून गुन्हा दाखल करणार
पंडित आणि पवार यांच्या बंगल्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात तणावाची परिस्थिती कायम आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, गोंधळ आणि दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास, पोलिस स्वतःहून गुन्हा दाखल करतील, असे अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बीड : बीडमध्ये मध्यरात्री 'मतदानासाठी नोटांचे वाटप करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते मात्र अशाही परिस्थिती मध्ये ७५ टक्के मतदान शांततेत पार पडले. माजलगावात बोगस मतदानाचा मुद्दा हा वादाचा ठरला, अंतर तरीही ८० टक्क्याच्या जवळपास मतदान झाले. धारूर मध्ये हि ७६ टक्के पेक्षा जास्त मतदान झाले. अंबाजोगाई मध्ये ७५ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर आणि बीड या सहा नगरपरिषदांमध्ये सरासरी ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून मतदारांनी आपला भावी नगराध्यक्ष आज निवडला आहे. आता २१ डिसेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.