Sambhajinagar Crime : दंगलीतील आरोपीच्या घरातून गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे साहित्य जप्त  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : दंगलीतील आरोपीच्या घरातून गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे साहित्य जप्त

एनडीपीएस पथकाची मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Gavti Kattha, drugs and Superstition materials seized from the house of the accused in the riots

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या घरात एनडीपीएसच्या पथकाने छापा मारून गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे साहित्य जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात करण्यात रविवारी (दि.७) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली. शेख नियाज शेख नजीर (३५, रा. मुजीब कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना आरोपी शेख नियाज हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकातील उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे तसेच अन्य अंमलदाराचे पथक घेऊन मुजीब कॉलनीत नियाजच्या घरी छापा मारला. एका खोलीत गादीखाली दोन पाकिटात सुमारे १२ ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले.

दुसऱ्या खोलीत कपाटात गावठी कट्टा आढळून आला. तसेच काळा जादू करण्याचे साहित्यही सापडले. किचनमध्ये संशयित पांढऱ्या रंगाचे सुमारे १९ ग्रॅम पावडर आढळून आल्याने ते जप्त करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुप्तधनासाठी जादूटोणा

आरोपीने काळ्या जादूने गुप्तधन काढण्यासाठी अघोरी विद्येचे मोठ्याप्रमाणात साहित्य घरात आणून ठेवले होते. यामध्ये दोन जनावरांची हाडे, कासवाचे आवरण, रसायनाच्या बाटल्या, काळ्या रंगाचे भुताचे मास्क, चामडी हंटर, १०९ कवट्यांची माळ, ५५ कवट्यांची माळ, ५३ कवट्यांची माळ, सिल्व्हर धातूचे रुमालात बांधलेले ८४ नाणे, सोनेरी रंगाचे ७९ नाणे, दोन इंजेक्शनचे सिरिंग, धातूचे कासव, अगरबत्ती व स्टॅन्ड, मेणबत्ती, ९ काळ्या रंगाचे दगडगोटे, हळद-कुंकू, ५०० ची जुनी बंद झालेली नोट, मेडिसिनची बाटली, असे साहित्य जप्त केले.

मुंबईहून आणले ड्रग्स

सूत्रांच्या माहितीनुसार, नियाज शेख हा शहागंज येथील २०१७ साली उसळलेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. सध्या तो फळविक्रीचा व्यवसाय करतो. मात्र त्यासोबतच त्याने ड्रग्स विक्रीही सुरू केली होती. मुंबईहून एमडी ड्रग्स आणून तो विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल

नियाज शेखने दहशत माजविण्यासाठी एक गावठी कट्टा आणला होता. त्याने याचा वापर कुठे केला का? याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र त्याच्यावर यापूर्वी दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यातच गावठी कट्टा सापडल्याने त्याच्या साथीदारांचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT