Gauri's arrival from house to house in excitement
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आली गवर आली... सोन पावली आली... असे विविध पारंपरिक गौरी गीते गात रविवारी (दि.३१) गौरीचे आगमन झाले. सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून उत्साहात गौराईचे स्वागत केले. अनेक भागांत गौराईला महालक्ष्मीही म्हणतात.
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे, रविवारी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. गौरी अगदी ५ ते १० इंचापासून ते दोन ते तीन फुटापर्यंत असतात. काही ठिकाणी पुतळे असतात तर काही ठिकाणी अगदी महिला शालू, पैठणी नेसून गौरीला सजवण्यात येते. दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो. आज मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्ठीला आगमन आवाहन झाले. सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन होणार आहे.
मुख्य पूजनाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.१) गौरींना वस्त्र, दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून त्यांची पूजा करण्यात येईल. तसेच १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ प्रकारच्या चटण्या आणि विविध पक्वान्नांचा नैवेद्य तयार करण्यात येईल. यात पुरणपोळी आणि ज्वारीच्या पिठाची आंबील हे पदार्थ महत्त्वाचे मानले जातात. तिसऱ्या दिवशी, मूळ नक्षत्रावर, गौरींचे विसर्जन केले जाईल. यावेळी त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून निरोप दिला जाईल. गौरींचे विसर्जन करताना मगौरी माघारी ये, लवकर येफ असे म्हणत पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आवाहन केले जाते.