Gangsters, drug den at Corode toll plaza
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : करोडी टोलनाका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा अड्डा बनले असून, या ठिकाणी दारू व गांजाचे खुलेआम सेवन, वाद निर्माण करणे, प्रवाशांना विनाकारण मारहाण करणे व धमकावणे यांसारख्या गंभीर घटना वारंवार घडत आहेत. गुरुवारी (दि.७) मनसेचे पदाधिकारी तक्रार करण्यास गेल्यानंतर त्यांनाही दांड्याने मारहाण करण्यात आली. त्यामुळे या टोलनाक्यावर कारवाई करण्याची मागणी महार-राष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.
शुक्रवारी (दि.८) दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, संकेत शेटे, बिपीन नाईक व मनीष जोगदंडे हे करोडी नाक्यावर टोल भरल्यानंतर त्यांनी रस्त्याची दुरवस्था व लाईट बंद असल्याची तक्रार कार्यालयात नोंदवण्याची विनंती केली. मात्र, प्रभू बागुल व त्याच्या ७ ते ८ साथीदारांनी संकेत शेटे यांच्यावर दांड्याने हल्ला करून बेदम मारहाण केली. हे सर्व गुंड करोडी टोल वसुली करणाऱ्या एजन्सीच्या संरक्षणात काम करत असून, एजन्सीचे मालक व त्यांच्या साथीदारांचाही गुंडगिरीस थेट पाठिंबा आहे.
यापूर्वी अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही काहीही कारवाई झाली नाही. प्रभू बागुल व त्याच्या गुंड साथीदारांना त्वरित अटक करावी. टोल वसुली एजन्सीचे मालक, साथीदारांची पोलिस पडताळणी करावी. टोल कार्यालयात सुरू असलेले दारू व गांजाचे अड्डे तात्काळ बंद करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित यंत्रणा उपलब्ध असावी, अनेक गुन्ह्यांत हात असणाऱ्या प्रभू बागुल व त्याचे सर्व संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे प्रकाश महाजन, दिलीप चितलांगे, बिपीन नाईक, गजन पाटील, आशिष सुरडकर, संकेत शेटे, मनीष जोगदंडे, राहुल पाटील, प्रशांत आटोळे आदी उपस्थित होते.
टोलनाक्यावर सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक करोडी टोलनाक्यावर मुद्दाम गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना नेमले आहे. तक्रार करणाऱ्यांना मारहाण केली जाते. माझी तक्रार घ्यायची नव्हती म्हणून त्यांनी थेट हल्ला चढविला. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. स्ट्रीट लाईट बंद करून काही जण चाकू, सुरा लावून लूटमारही करतात. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडेही तक्रार करणार आहे. कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.संकेत शेटे, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे