गंगापुर (पुढारी वृत्तसेवा): गंगापुर शहरालगतच्या छत्रपती संभाजीनगर रोडवर आज (६ जून) दुपारी सुमारे दीड वाजता थरारक गोळीबाराची घटना घडली. एका अज्ञात सराईत गुन्हेगाराने २८ वर्षीय तरुणावर थेट गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जामगाव (ता. गंगापुर) येथील आदिनाथ दिलीप जाधव हा तरुण वाजे अमृततुल्य हॉटेलजवळ चहा पिण्यास गेला असताना लघुशंकेसाठी मागील मोकळ्या शेतात गेला. याचवेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला. आदिनाथने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. ती गोळी त्याच्या बरगडीला चाटून गेली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. हल्लेखोराने पुन्हा दोन गोळ्या झाडल्या, त्या त्याच्या मांडीला चाटून गेल्या.
या प्रसंगी आदिनाथने धाडस दाखवत हल्लेखोराच्या हातातील पिस्तुल हिसकावले आणि घटनास्थळावरून मोटरसायकलने थेट पोलीस ठाण्यात गेला. त्याने आपल्यावर गोळीबार झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला तत्काळ गंगापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दिनकर थोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी तोपर्यंत फरार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दोन जिवंत आणि एक रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.