गंगापूर : शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून विक्रीसाठी मांस साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळी छापा टाकला. या कारवाईत २५० किलो संशयित गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरलेले दोन धारदार सुरे असा ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता अतीक अय्युब कुरेशी (वय ३६, रा. कुरेशी मोहल्ला) यांच्या राहत्या घरालगतच्या मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. तेथे विक्रीसाठी ठेवलेले सुमारे २५० किलो संशयित गोवंश मांस (अंदाजे किंमत ५० हजार रुपये) तसेच कत्तलीसाठी वापरण्यात आलेले दोन धारदार सुरे (किंमत ६०० रुपये) जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पोलिस अंमलदार रमेश जारवाल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अतीक अय्युब कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सफौ डी. वाय. अवधूत यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ अमित पाटील करीत आहेत.