गंगापूर : गंगापूर तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, सलग दोन रात्रींमध्ये बिबट्याने गाय व बकरीचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे, तर जामगावलगत शेतमजुरांना बिबट्याचे थेट दर्शन झाले असून, कायगाव शिवारातही बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
वरखेड येथे नुकताच एक बिबट्या जेरबंद करण्यात आला असतानाच तालुक्याच्या विविध भागांत पुन्हा बिबट्यांचा संचार वाढल्याने 'तालुक्यात नेमके किती बिबटे फिरत आहेत?' असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. गंगापूर शिवारातील गट क्रमांक ९०/२ मधील शेतात शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला करून शेतकरी भालचंद शिंदे यांच्या गायीला ठार मारले. रविवारी वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
वनपाल के. व्ही. बमणावत यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. जुने ममदापूर येथेही बिबट्याने धुमाकूळ घातला. रविवारी रात्री ईश्वर अमृते यांच्या शेडमधील बकरी बिबट्याने ओढत नेली. त्यानंतर जवळील उसाच्या शेतात बकरीचा फडशा पाडल्याचे आढळून आले. दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेतमजुरांसमोर बिबट्याचे दर्शनजामगावलगत गट क्रमांक २३ मध्ये रविवारी शेतमजुरांना बिबट्याचे थेट दर्शन झाले. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली. सध्या शेतात पिकांची कामे सुरू असल्याने मजुरांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. कायगाव शिवारातही वावरकायगाव शिवारातील गट क्रमांक ७जवळही बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गंगापूर, जामगाव, जुने ममदापूर, कायगाव या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे
एक जेरबंद; मात्र दुसरे किती? वरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने नुकतेच पिंजऱ्यात जेरबंद केले होते. मात्र त्यानंतरही तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांत बिबट्याचे दर्शन आणि पशुधनावरील हल्ल्यांच्या घटना समोर येत असल्याने तालुक्यात एकापेक्षा अधिक बिबटे फिरत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वन विभागाने गस्त वाढवण्याची मागणीशेतांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांमध्ये भीतीचे सावट आहे. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून बिबट्यांचा शोध घ्यावा, तसेच गरज भासल्यास पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.