गंगापूर : होम लोनची ईएमआय तारीख व मोबाईल नंबर बदलून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी गंगापूर येथील एका औषध व्यावसायिकाची तब्बल १ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल विजय नावंदर (४६, रा. नरसिंह कॉलनी, गंगापूर) हे मेडिकल औषधांचे घाऊक विक्रेते आहेत. त्यांनी घरबांधणीसाठी २०२३ मध्ये आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाच्या ईएमआयची तारीख बदलण्यासाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता.
याच दरम्यान काही मिनिटांतच अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून ईएमआयची तारीख आणि मोबाईल नंबर बदलून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. नावंदर यांनी ती लिंक डाउनलोड करताच त्यांचा मोबाईल काही काळासाठी ब्लँक झाला आणि बंद पडल्यासारखा झाला.
सुमारे तासाभरानंतर मोबाईल पुन्हा सुरू झाल्यावर त्यांनी फोन-पे आणि बँक खात्यांची तपासणी केली असता त्यांच्या खात्यांतून मोठी रक्कम परस्पर काढून घेतल्याचे समोर आले. सायबर भामट्यांनी त्यांच्या आईच्या नावावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून ९५ हजार रुपये तर त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातून ६५ हजार रुपये, अशी एकूण १ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन लूट केल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच नावंदर यांनी तातडीने १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर संबंधित बँक खाती ब्लॉक करण्यात आली असून ऑनलाईन तक्रारही दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बँक, फायनान्स कंपनी किंवा सरकारी संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून लिंक पाठवून फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही अनोळखी लिंक डाउनलोड करू नये, मोबाईलवर रिमोट ॲक्सेस ॲप किंवा संशयास्पद फाइल इन्स्टॉल करू नये. तसेच संशयास्पद व्यवहार आढळताच तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.