Gangapur Crime News : Married Woman Harassed for Gold Ring and ₹10 Lakhs
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा माहेराहून सोन्याची अंगठी तसेच कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तब्बल १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात पती, सासू-सासरे, नणंद व नंदोई अशा सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिला नुतन अमोल गव्हाणे (रा. भेंडा बु., ता. नेवासा, जि. अहिल्यानगर; ह.मु. ममदापूर, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाच्या लग्नावेळी पती अमोल गव्हाणे यांनी मांडव परतणीसाठी एक तोळ्याची सोन्याची अंगठी देण्याची मागणी केली होती. मात्र माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सासू रोहिणी गव्हाणे, सासरे अशोक गव्हाणे, नणंद आश्विनी तारडे, शितल कोळसे व नंदोई प्रशांत कोळसे यांनी पतीला पत्नीविरोधात भडकवत ङ्गङ्घअंगठी दिली नाही तर तिला नांदवू नकोफ्फ असे सांगितल्याचा आरोपही महिलेने केला आहे. त्यानंतर पतीकडून शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पतीने कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास पत्नीला नांदवणार नसल्याची भूमिका घेत वारंवार मारहाण व छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २८ जून २०२५ रोजी पुन्हा मारहाण झाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी सासर गाठून समेटाचा प्रयत्न केला. मात्र पैसे देत नसाल तर मुलीला घेऊन जा असे सांगत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.