Vaijapur Gang war : वैजापुरात मिर्झापूरसारखा गँगवॉर; दोन गटांत रक्तरंजित संघर्ष ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur Gang war : वैजापुरात मिर्झापूरसारखा गँगवॉर; दोन गटांत रक्तरंजित संघर्ष !

कोयते, लोखंडी कत्त्या, रॉडने बेछूट हल्ले; काहींची प्रकृती चिंताजनक, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

Gang war in Vaijapur, reminiscent of Mirzapur; a bloody conflict between two groups!

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादाचा वणवा पुन्हा भडकून शनिवारी (दि. ३१) वैजापूरच्या येवला रोड परिसरात अक्षरशः रक्ताचा सडा पडला. कोयते, लोखंडी कत्त्या, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी एकमेकांवर बेछूट हल्ले करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या थरारक संघर्षात अनेक जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

या घटनेमुळे शहरात मिर्झापूर चित्रपटातील गँगवॉरसारखे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकही हादरले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हॉटेल शान-ए-मराठा परिसरात झालेल्या जुन्या वादाची ठिणगी या संघर्षाला कारणीभूत ठरल्याचे तक्रारींवरून समोर आले आहे. शनिवारी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.

शान पवार, रोहित पठारे, प्रितेश साळुंके, विशाल पवार, तुषार पठारे, आदेश शेवाळे यांच्यासह हॉटेलमधील इतर कामगारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास संघर्षाची दुसरी बाजू समोर आली. हॉटेल व्यावसायिक भूषण पवार यांच्या फिर्यादीवरून नितीन हॉड, गौरव होंड, गजु राजपूत, क्रिश राजपूत, संकेत आहेर, प्रतीक लुटे, सुजित ठाकूर, विशाल कडे, रोहित आहेर, हर्षद राजपूत, अमर राजपूत, तुषार आहेर, मयूर रहाणे व इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत.

जखमींची नावे

कृष्णा जाधव, निर्भय पवार, विशाल कडे, सुजित राजपूत, विशाल पवार, शान पवार, संतोष शिहरे, आदेश शेवाळे, भूषण पवार, तुषार पठारे, रोहित पठारे यांच्यासह इतरही काही जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना घाटी रुग्णालयासह येवला, कोपरगाव आणि वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.

मारहाणीनंतर रस्त्यावर फेकले !

एका जखमीला शहराबाहेर नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचे दोन्ही पाय दगडाने ठेचून त्याला स्टेशन रोड परिसरात फेकून दिल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

जुन्या वादावर वेळीच कारवाई झाली होती का ?

गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादानंतर पुन्हा असा रक्तरंजित संघर्ष होण्याची वेळ का आली? जुन्या वादातील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते; मात्र त्यांच्यावर कडक कारवाई झाली होती का? सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह हल्ले करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT