Gang of contractors attacks engineer's house over bogus bills
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर उपसा सिंचन योजनेचे काम न करताच तब्बल ४० लाख रुपयांचे बोगस बिल मंजूर करण्यासाठी मुजोर कंत्राटदारांच्या एका टोळीने थेट जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या घरावर हल्ला केला. या कंत्राटदारांनी अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांना, तसेच मध्यस्थीला आलेल्या त्यांच्या सासऱ्याला आणि मेव्हण्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
ही घटना शुक्रवारी (दि.१८) रात्री ९:३० ते १०:५० वाजेच्या दरम्यान टिळकनगर भागात घडली. या प्रकरणी पाच कंत्राटदारांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात अगोदर एनसी नोंद झाली होती. मात्र, अखेर अभियंत्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
संदीप गोरे, आशिष वाघचौरे, अथर्व वाघचौरे, जयदीप काजळे आणि एक अनोळखी ड्रायव्हर अशी या गुंड प्रवृत्तीच्या कंत्राटदारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल गावंडे हे जलसंपदा विभागात (लघु पाटबंधारे विभाग क्र. १) उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर आरोपी हे 'वर्कमेट कंपनी'च्या नावाखाली कंत्राटदार म्हणून काम करतात.
गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम न करताच ४० लाख रुपयांचे बिल पास करण्यासाठी या कंत्राटदारांचा गावंडे यांच्यावर सातत्याने दबाव होता. शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेनऊ वाजता संदीप गोरे याने आशिष वाघचौरे याच्या मोबाईलवरून गावंडे यांना कॉल केला. शिवीगाळ करून सर्वेक्षणाचे बिल परत द्या, बिल परत नाही केले तर घरी येऊन मारीन अशी थेट धमकी दिली. घरामध्ये गावंडे दाम्पत्य आणि त्यांची दोन मुले होती.
या धमकीमुळे कुटुंबीय प्रचंड घाबरले. गावंडे यांच्या पत्नीने त्यांचे वडील आणि भावाला घरी बोलावून घेतले. दरम्यान, धमकी दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच रात्री १० वाजता या मुजोरांनी फॉर्च्यूनर (एमएच-२०-९९००) आणि महिंद्रा एक्यूव्ही (एमएच-२०-जीव्ही-६०२५) अशा दोन गाड्यांमधून टिळकनगर गाठले. गाडीतून उतरताच त्यांनी गावंडे यांना जबरदस्तीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. गावंडे यांनी नकार देताच संदीप गोरे आणि त्याच्या साथीदारांनी थेट त्यांची कॉलर पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी फेकला मोबाईल
कंत्राटदारांचा हा राडा पाहून गावंडे यांचे सासरे नंदकिशोर जाधव आणि मेव्हणे रोहन जाधव हे त्यांना सोडवण्यासाठी धावले. मात्र, या गुंड कंत्राटदारांनी त्यांनाही सोडले नाही, सर्वांनी मिळून सासरे आणि मेव्हण्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व थरार गावंडे यांच्या पत्नी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होत्या.
हे पाहताच आरोपी अथर्व वाघचौरे त्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फेकून दिला. गळ्यातील ११ ग्रॅमची सोन्याची चेन हिसकावली. यानंतर अत्यंत अश्लील शिवीगाळ आणि धमक्या देत हे सर्वजण गाड्यांमध्ये बसून तेथून पसार झाले. शासकीय अधिकाऱ्यावर घरात घुसून झालेल्या या भ्याड आणि गुंडगिरीच्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असून जवाहर नगर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
काम न करताच ४० लाखांच्या बिलासाठी दबाव आरोपी संदीप गोरे आणि आशिष वाघचौरे यांनी गंगापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत भूमिगत पाइपलाइनच्या सर्वेक्षणाचे १.६७कोटी रुपयांचे कंत्राट घेतले आहे. या कामापोटी त्यांना यापूर्वी अनुक्रमे ८० लाख आणि ४० लाख रुपयांची दोन बिले अदा केली होती. मात्र, सर्वेक्षणाचे उर्वरित काम अर्धवट असतानाही उरलेले ४० लाख रुपयांचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी गावंडे यांच्यावर कंत्रादार अनेक दिवसांपासून दबाव आणत होते. यापूर्वीही कार्यालयात येऊन धमक्या दिल्या होत्या.