Ganesha Mahasang, symbol of all religion equality, is making its debut in 101 years
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: गणेश महासंघाची १९२४ साली स्थापना झाली असून, यंदा गणेश महासंघ आता १०१ वर्षांचा झाला आहे. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शहराचा महासंघ सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन तत्कालीन औरंगाबादेत (आताचे छ. संभाजीनगर) १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक मगणेशभक्त भजन मंडळफ स्थापन झाले.
मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघाची स्थापना करण्यात आली. पहिल्या गणेश संघाचे अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान होते. कार्यकारिणीत डॉ. पूरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुर लीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, पहिले न. प. अध्यक्ष अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबुलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये आदी मातब्बरांचा यात समावेश होता.
गणेश महासंघाची १९२४ साली स्थापना झाल्यानंतर १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. यात मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. तसेच मच्छली खडकवरील वसंत भवन, शहागंजमधील बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते.
१९७३ मध्ये सतसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळी शिवनाथ राठी व अशोक शहा यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली होती. दरम्यान ८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव मश्री औरंगाबाद गणेश महासंघफ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. तेव्हापासून सर्व राजकीय पक्ष समभाव जपला जातो. यंदा छत्रपती संभाजीनगर श्रीगणेश महासंघासह नवीन छत्रपती संभाजीनगर, सिडको-हडको व छावणी असे पाच महासंघ असून, सर्व मिळून ३ हजार गणेश मंडळांच्या वतीने मश्रींफची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात आतापर्यंत केवळ दीड हजारांच्या आसपासच मंडळांनी नोंदणी केली आहे.
पूर्वी गणेश उत्सव संघाचे कार्य जिल्हाभर असायचे. या गणेशोत्सवातून विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत नेतृत्व करणारे नेते घडले. याचे किंगमेकर होते दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, सतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले आदींचा समावेश होतो. श्री गणेश संघाला १९७३-१९७४ या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा स्मरणिकाचे प्रकाशन करण्यात आले होते.