छत्रपती संभाजीनगर : गणपती आगमन मिरवणुकीत एकमेकांना खुन्नस दिल्याच्या कारणावरून शनिवारी (दि.२३) मध्यरात्री राजाबाजार भागात दोन गट आमनेसामने येऊन तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी तलवार, शस्त्रे उपसल्याने परिसरात तणाव होता. सिटी चौक पोलिसांनी धाव घेतली, मात्र दंगेखोर पसार झाले होते.
विनित सुरासे, नितीन चौंडी, सनी डुगलज, विशाल महारगुडे, पुनित गादिया, समर्थ काळे व इतर चार ते पाच इसम (सर्व रा. राजाबाजार) यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सोमवारी (दि.२५) दिली. तत्पूर्वी पुनित गादिया याला शस्त्र अधिनियमचे उल्लंघन केल्याने ताब्यात घेऊन तलवार जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाबाजार कुंवारफल्ली भागात शनिवारी गणपती आगमन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत आरोपींच्या दोन्ही गटांत खुन्नस देण्यावरून वाद झाला होता. तसेच यांचे आपापसांत जुने वाद असल्याने वाद आणखीनच उफाळून आला. रात्री दीडच्या सुमारास दोन्ही गटांतील दहा ते बारा तरुण तलवारी उपसून आमनेसामने आले. शिवीगाळ आणि हाणामारी सुरू झाली. तलवारी हवेत फिरविल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
राजाबाजार भागात यापूर्वीही दंगल घडल्याने हा भाग अतिसंवेदनशील आहे. यापूर्वीही येथे किरकोळ वादातून मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र गणेशोत्सव काळात घडणाऱ्या गंभीर घटनांनी पोलिसांनी चिंता वाढविली आहे.
पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत दंगेखोर पसार झाले होते. पुनित याला ताब्यात घेऊन एक तलवार जप्त केली. त्याला एका गुन्ह्यात नोटीस देऊन सोडल्यानंतर रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता पुनितसह अन्य सर्वच आरोपींचा, तलवारी, चाकू पोलिसांकडून शोधले जात आहेत.
राजाबाजार भागात यापूर्वीही दंगल घडल्याने हा भाग अतिसंवेदनशील आहे. यापूर्वीही येथे किरकोळ वादातून मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र गणेशोत्सव काळात घडणाऱ्या गंभीर घटनांनी पोलिसांनी चिंता वाढविली आहे.