Fridge and cooler purchased using stolen jewelry
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या कचरा गाडीवरील काम गेल्याने बेरोजगार झालेल्या एकाने शेजाऱ्याच्याच घरात डल्ला मारून लाखाचे दागिने लंपास केले. या चोरीच्या पैशातून त्याने चक्क नवीन कपडे, फ्रीज, कूलर आणि पलंग खरेदी केला. मात्र त्याच्या या अचानक बदललेल्या लाईफस्टाईलमुळेच तो गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. दीपक दामोधर बोर्डे (३४, रा. वैतागवाडी, कांचनवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी रविवारी (दि. १४) दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी माया संतोष रायकर यांच्या घराशेजारीच आरोपी दिपक बोर्डे हा राहतो. तो पूर्वी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर कामाला होता. मात्र, चार-पाच महिन्यांपूर्वी पालिकेने कंत्राट बदलल्याने बोर्डेला कामधंदा नव्हता. त्याला पोलिसांनी जप्त केलेले दागिने दारूचेही व्यसन होते. खर्चाला पैसे नसल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला.
शेजारी राहणारे रायकर कुटुंब २४ एप्रिल ते १ मे दरम्यान कामानिमित्त बाहेर जाताच त्याने घरात प्रवेश करून सोनसाखळी, कर्णफुले, सोन्याची पोत, अंगठी असे दागिने कपाटाच्या लॉकरमधून लंपास केले. दागिने विकून बोर्डेने नवीन कपडे, फ्रीज, कूलर आणि पलंगासह फर्निचरचे साहित्य खरेदी केले.
त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८४ हजाराचे दागिने आणि दागिने विक्री करून घेतलेले ३४ हजारांचे फ्रीज, कूलर, पलंग असे फर्निचरचे सामान जप्त केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, सुनील जाधव, दीपक शिंदे, शिनगारे, वाडीलला जाधव, गीता शिकारे आणि पूजा इंगळे यांच्या पथकाने केली.
खरेदीच्या सपाट्याने आला घेऱ्यात
बोर्डे नवीन वस्तू खरेदी करून घरी आणत असल्याचा प्रकार पाहून गुन्हे शाखेला संशय आला. कोणताही कामधंदा नसताना हा एकाच वेळी चार ड्रेस आणि घरात एवढे नवीन साहित्य कसे काय घेऊन आला, याची चौकशी केली. १३ जून रोजी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. साहित्य खरेदी करण्याशिवाय त्याने उरलेले पैसे फिरण्यात आणि दारूमध्ये उडविले.