Fraud Case: Lured with the Promise of Setting Up a Garage in Pune; Youth Cheated of ₹12 Lakhs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यात फोर व्हिलर गाडीचे गॅरेज टाकून देण्याचे आमिष दाखवून एका तरुण शेतकऱ्याला गावातीलच एकाने ११ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १ जून २०२५ ते ८ जानेवारी या काळात टीव्ही सेंटर भागात घडला. संतोष रंगनाथ पाटील गोराडे (रा. ह.मु. वाघोली, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ८) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मधुकर संतु गाडेकर (३७, रा. मारसावळी, ता. फुलंब्री) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या गावातील आणि सध्या वाघोली (पुणे) येथे राहणारा संतोष गोराडे हा गावी आला होता. त्याचे स्वतःचे पुण्यात गॅरेज असल्याने त्याने गाडेकर बंधूंना विमाननगर येथे ओळखीच्या जागेवर गॅरेज टाकण्याचा सल्ला दिला आणि तिथे चांगली कमाई होईल असा विश्वास दिला. गॅरेजसाठी लागणारे दोन लिफ्ट मशीन आणि इतर साहित्य चेन्नईहून २५ लाख रुपयांत आणून देतो, असे सांगून त्याने ही जबाबदारी घेतली.
बँकेचे कर्ज आणि सोने तारण ठेवून उभारला निधी
संतोष गोराडेवर विश्वास ठेवून गाडेकर बंधूंनी सिडकोतील अॅक्सिस बँकेतून २५ लाख ५० हजार रुपयांचे बिझनेस लोन काढले. तसेच घरातील ३१ ग्रॅम सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीकडून ३ लाख रुपये उभे केले. साहित्यासाठी गोराडेने वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार गाडेकर यांनी आरटीजीएस, फोनपे आणि रोख स्वरूपात गोराडेला तब्बल १९ लाख ८४ हजार ८०० रुपये दिले.
पैसे घेऊनही गोराडेने गॅरेजमध्ये केवळ ५ लाख ८१ हजार रुपयांचेच साहित्य आणून टाकले. उर्वरित पैशांबाबत आणि साहित्याच्या बिलाबाबत विचारणा केली असता, त्याने पुण्याच्या एका कंपनीचे ६ लाख १४ हजार ४८ रुपयांचे बिल पाठवले.
मात्र, गाडेकर यांनी जानेवारीमध्ये स्वतः पुणे येथे जाऊन संबंधित कंपनीकडे चौकशी केली असता, त्या १७ नग सामानाची खरी किंमत केवळ अडीच लाख रुपये असल्याचे उघड झाले. तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत