Four arrested for kidnapping and beating student
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
प्रेयसीला बोलण्यावरून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे थार जीपमधून चौघांनी अपहरण केले. त्याला साई टेकडी भागात नेऊन बेल्ट, रॉडने बेदम मारहाण केली होती. रात्रभर जीपमध्ये फिरवून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी (दि.७) उत्सव चौक भागात घडला होता. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी चारही आर-ोपींना अटक केली आहे.
अनिकेत उद्धव कणसे (२२, रा. गेस्ट हाऊस रोड, पैठण), अजय गोरख महापुरे (१९, रा. नाणेगाव, ता. पैठण), महेश बळीराम राख (२०, रा. गेवराई गाव, पैठण) आणि अभिषेक केसरसिंग शिसोदे (२२, रा. बोलटगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी बुधवारी दिली. चौघांची न्यायालयाने हर्सल कारागृहात रवानगी केली.
फिर्यादी निखिल शंकर तायडे (१७, रा. अंधारी, ता. सिल्लोड, ह.मु. विकासनगर, उस्मानपुरा) हा बारावीचा विद्यार्थी असून, तो शहरात राहून नीटचे क्लास करतो. शनिवारी (दि.७) रात्री साडेआठ वाजता तो मेसवर जेवण करण्यासाठी निघाला. उत्सव चौकात थार जीपमधून आलेल्या मुख्य आरोपी अनिकेत आणि अजय यांनी निखिलला बळजबरी गाडीत बसविले. जीपमध्ये अन्य दोन आरोपीही होते. अनिकेतने निखिलला तू भारतीला बोलून माझ्याशी गद्दारी केलीस. तू माझे वाटोळे केले आहेस. तुला खूप मस्ती आली आहे, असे म्हणत गाडीतच मारहाण सुरू केली.
जीप प्रतापनगर मैदानावर नेऊन तेथे निखिलला पुन्हा शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी निखिलला साई टेकडी भागात नेले आणि बेल्ट, लोखंडी रॉडने रात्रभर मारहाण केली. रविवारी (दि.८) सकाळी आठ वाजता खोलीजवळ आणून सोडले. यापुढे जर भारतीला बोलला तर तुला जिवे मारू, अशी धमकी देऊन पसार झाले होते. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून थार जीप, बेल्ट, रॉड जप्त केला आहे.
मुख्य आरोपी अनिकेत कणसे बीएचा तर त्याचे मित्र अजय, महेश आणि अभिषेक हे तिघे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. अनिकेतचे वडील केटरिंगचा व्यवसाय करतात. थार गाडी अनिकेतच्या नावावर आहे. अनिकेतचे प्रेमप्रकरण सुरू असलेल्या तरुणीशी निखिल बोलत असल्याच्या कारणावरून त्याला जीपमधून अपहरण करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.