FDA : जेवणाच्या ताटात दुर्गंधीयुक्त पनीर अन् जिवंत किडे ! file photo
छत्रपती संभाजीनगर

FDA : जेवणाच्या ताटात दुर्गंधीयुक्त पनीर अन् जिवंत किडे !

ग्राहकांच्या आरोग्याचा खेळ ! 'छप्पन भोग' सह 'गायत्री मेवाड'चा परवाना एफडीएकडून निलंबित

पुढारी वृत्तसेवा

Foul-smelling paneer and live insects on the dinner plate!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्राहकांना जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीठांत चक्क जिवंत किडे आणि दुर्गंधीयुक्त पनीर तसेच स्वच्छतागृहासमोर अस्वच्छ ठिकाणी भाज्या, उकडलेले नुडल्स यांसह काळ्याकुट्ट तेलाचा वापर असे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्याने क्रांती चौक येथील 'गायत्री मेवाड' आणि बीड बायपास येथील 'छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट' चा परवाना एफडीएकडून तत्काळ निलंबित करण्यात आला.

'सुरक्षित अन्न, सुरक्षति महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत राज्यभरात अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू आहे. या मोहिमेंतर्गतच अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. झाडे यांनी गुरुवारी शहरातील बीड बायपास रस्त्यावरील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्युएट हॉल' च्या 'छप्पन भोग थाळी' ची अचानक पाहणीत ज्वारी आणि बाजरीच्या पिठात जिवंत किडे व अळ्या आढळून आल्या. तसेच रसायने, वैयक्तिक वस्तू आणि अन्नपदार्थ एकत्र ठेवण्यात आले होते.

शीतकपाटातील अन्नावर कोणत्याही तारखेच्या नोंदी नव्हत्या. पिण्याच्या पाण्याची चाचणी, कच्च्या मालाची खरेदी बिले, प्रयोगशाळा चाचणी अहवाल आणि वापरलेल्या खाद्यतेलाच्या विल्हेवारीची कोणतीही नोंद आढळली नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेचे आवश्यक प्रशिक्षण दिलेले नव्हते, तारीख-तापमान मोजणाऱ्या उपकरणांची तपासणी झालेली नव्हती. त्यामुळे सहआयुक्त श्रीकांत करकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांनी छप्पन भोग थाळीचा अन्न परवाना तत्काळ निलंबन केला.

आधी ५० हजारांचा दंड तरी, मेवाडमधील ताटात निकृष्ट जेवण

क्रांती चौकातील 'गायत्री मेवाड' मध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने पथकाला प्रत्येक टप्प्यावर गंभीर निष्काळजीपणा दिसून आला. भाजीसाठी कापून ठेवलेले पनीर दुर्गंधीयुक्त आढळले. सांडपाण्याच्या ठिकाणीच उकडलेले नूडल्स उघड्यावर ठेवले होते. अत्यंत संतापजनक म्हणजे स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारासमोर अस्वच्छ ठिकाणी भाज्या कापल्या जात होत्या. तळण्यासाठीचे तेल वारंवार गरम करून पूर्णपणे काळे झाले होते, जे कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण ठरू शकते. कांदे व इतर कच्चे अन्नपदार्थ थेट जमिनीवर अस्वच्छ स्थितीत साठवले होते. एफडीएने १८ डिसेंबर २०२५ च्या पाहणीनंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी सुधारणा नोटीस दिली होती. १० एप्रिल २०२६ रोजी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तरीही या उपाहारगृहाने कोणतीही सुधारणा केली नाही.

अन्न पदार्थ विकल्यास थेट फौजदारी कारवाई

निलंबन कालावधीत या दोन्ही उपाहारगृहांना अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास पूर्णपणे बंदी आहे. परवान्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवल्यास थेट कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच शहरातील सर्व उपाहारगृहे व खाद्यपेय विक्रेत्यांनी अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सक्त इशारा सहआयुक्त श्रीकांत करकले यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT