Former mayor Rashid Khan joins the Thackeray Sena
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माजी महापौर तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अब्दुल रशीद खान यांनी शुक्रवारी (दि.१९) पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे (ठाकरे गट) शिवबंधन बांधले. माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. परंतु त्यांच्या या प्रवेशानंतर आता सेनेतून बाहेर पडलेल्या माजी पदाधिकाऱ्यांकडून टीका होत आहे. १९८८ सालच्या दंगलीत पहिला दगड हिंदूंवर भिरकाविणाऱ्यांना सेनेने शिवबंधन बांधले, असे म्हणत माजी जिल्हाध्यक्ष राधकृष्ण गायकवाड यांनी प्रवेशावर संताप व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून अनेक जण भाजप आणि शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. असे असतानाच शुक्रवारी काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ पदाधिकारी अब्दुल रशीद मामू खान यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला.
राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह छावणीचे माजी उपध्यक्ष किशोर कच्छवाह, गणेश लोखंडे यांची उपस्थितीत प्रवेश सोहळ्याची ही माहिती सोशल मिडीयावरून शहरात व्हायरल झाली. त्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अनेकांनी या प्रवेशावर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
यावर सध्या भाजपमध्ये असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राधाकृष्ण गायकवाड यांनी रोष व्यक्त केला. ते म्हणाले की, राज्यात १९८८ साली जी दंगल झाली, त्या दंगलीवेळी पैठणगेट येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर मशिदीतून पहिला दगड हा माजी महापौर रशीद खान यांनीच मारला होता, परंतु ज्याने हिंदूंना दगड मारला, त्यालाच शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश देण्याची वेळ ठाकरे गटावर आली आहे, असे म्हणत गायकवाड यांनी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. केवळ एक जागा ही एसटीसाठी आरक्षित असल्याने त्यासाठी ही धडपड सेनेची असल्याचा आरोपही त्यांनी केला.