Flowers Rate increase occasion of Ganeshotsav
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : गणेशोत्सव आणि गौरी आगमननिमित्त हार, गजऱ्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे फुलांनाही सोन्याचा भाव आला असून, २० रुपयांना मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार ८० रुपयांवर गेला आहे. लहानमूर्तीचा हार ४० रुपयांना मिळत आहे. ३०० रुपयांचा अर्धा काकडा होलसेल फूल मार्केटमध्ये बाराशे रुपयांवर गेला.
शहरातील सिटी चौक फूल मार्केट आणि जाधववाडी बाजार समिती येथे जिल्ह्यासह जालना, परभणी, बीड, मुदखेड, सतोना येथून फुलांची आवक होते. साधारण दररोज शंभर क्विटलहून अधिक फूल शहरात येतात. सध्या सणासुदीमुळे फुलांची मागणी वाढली असतानात पावसामुळे फूल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो क्विटल मालही भिजला.
याचा परिणाम फूल बाजारावर दिसून येत असून, चार दिवसांपासून फुलांचे दर चारपटीने वाढले आहेत. झेंडू, गुलाब, काकडा, निशिगंध, शेवंती आणि गलांडा अशा सर्वच फुलांचे भाव विक्रेत्यांनी वाढवले आहेत. शेतकऱ्यांकडून होलसेल बाजारात स्वस्तात घेतलेले फूल विक्रेत्यांकडून चौपट दराने विक्री केले जात आहे. २० रुपयांचा झेंडूचा हार ८० ते १००, लहान हार ३० ते ४० मोठा हार १५० ते ३००, गुलाब, निशीगंध आणि शेवंती फुलांचे दरही आकाशाला भिडले असताना गणेशभक्तांकडून खरेदीचा उत्साह कायम आहे. हार, फुले खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
पावसामुळे फुलांचा माल भिजला आहे. यामुळे आवक घटली आहे. याचा घाऊक बाजारात फूल उत्पादक शेतकऱ्यांना फारसा फायदा नाही. किरकोळ फूल विक्रेत्यांकडे हार, फूल महाग विकली जात आहेत. -बाबासाहेब तांबे, घाऊक व्यापारी, फूल बाजार