Five-tola chain snatched from young female doctor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एमजीएम रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या गळ्यातील ५ तोळ्याची सोन्याची साखळी स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोन लुटारूंनी ओरबाडून नेल्याची घटना शनिवारी (दि.१३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी आर्या अभय काळे (२२, मूळ रा. अमरावती, सध्या रा. इंद्रायणी हॉस्टेल, एमजीएम) यांच्या तक्रारीनुसार, त्या वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण करून सध्या एमजीएम रुग्णालयात इंटर्नशिप करत आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या जिमवरून रुक्मिणी हॉलमार्गे द्वारकादास शामकुमारकडे पायी जात होत्या.
ते रुक्मिणी हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गेटजवळ पोहोचले असता, त्याचवेळी पाठीमागून राँग साईडने एका काळ्या रंगाच्या आर-१५ स्पोर्टस् बाईकवरून अंदाजे २५ ते २६ वर्षे वयाचे दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. या भामट्यांनी जवळ येताच आर्या यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन क्षणार्धात ओरबाडून घेत धूम ठोकली. आर्या यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
२५ वर्षापूर्वी आईने बनवली होती चेन
ही सोन्याची चेन आर्या यांच्या आईने २५ वर्षांपूर्वी स्वतःसाठी बनवली होती. सध्या ती चेन आईने आर्याला वापरण्यासाठी दिली होती.