छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाच्या जळीतकांडाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. या पथकाने रविवारपासूनच तपासकामाला सुरुवात केली. त्यासाठी येथील तिन्ही दुय्यम निबंधक कार्यालये सोमवारी (दि.१२) दिवसभर बंद ठेवण्यात आली. मंगळवारीही ही कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची तीन दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यातील कार्यालय क्रमांक १ ला शनिवारी आग लागली. एका व्यक्तीने खिडकीतून आगीचे लोळ टाकून हे कार्यालय पेटवून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकाराचे गांभीर्य विचारात घेऊन त्याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.
सीआयडी पथक दोन दिवसांपासून तपास करत आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर येथील तिन्ही कार्यालये बंद ठेवण्यात आली. आता उद्या मंगळवारीही ही कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे जमिनी, घरे खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. नोंदणी विभागाच्या कार्यालयांचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले होते.
जळीतकांडामुळे यातील १ कार्यालय पूर्णपणे जळाले. आतील पडदे, संगणक, प्रिन्टर, लाकडी कपाट, त्यातील दस्तऐवज, वॉल फॅन असे साहित्य जळून गेले. आगीचा धूर संपूर्ण कार्यालयात पसरल्याने कार्यालयातील इतरही संगणक, कपाट, फर्निचर आणि इतर साहित्य काळवंडून खराब झाले आहे.
सीसीटीव्हीत कृत्य कैद
कर्मचाऱ्यांनी या परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ४.४५ वाजता डोक्यावर टोपी घातलेला एक व्यक्ती नोंदणी विभागाच्या मागील गेटने प्रवेश करीत असल्याचे दिसून येतो. त्याच्या हातामध्ये कापडी पिशवी असून, काही वेळानंतर या सीसीटीव्हीमध्ये आगीचे प्रतिबिंब दिसून येते. त्यानंतर हा व्यक्ती ४.५० ला त्याच गेटने परत जाताना दिसून येतो. मात्र जाताना त्याच्या पिशवीमध्ये काहीही नसल्याचे दिसून येत आहे. विडीकीतून आगीचे लोळ फेकल्याचेही यात दिसून येत आहे.
अहवाल मागितल्यावर दोनच दिवसांत आग
नोंदणी कार्यालयांमध्ये तुकड्यांची बेकायदेशीर नोंदणी होत असल्याबाबत संदीप वायसळ यांनी पुराव्यानीशी तक्रार नोंदविली होती. त्याची दखल घेत सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी मागील तीन महिन्यांत झालेल्या दस्तांच्या नोंदणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत येथील कार्यालयाला आग लागली.