Fines of Rs 44.46 crore pending against lakhs of vehicle owners
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी दंडाची कारवाई केली. मात्र ऑनलाईन दंडाच्या पावत्या देऊनही १ लाख वाहनधारकांनी तब्बल ४४ कोटी ४६ लाखांचा दंड अद्यापही भरलेला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरापासून वाहनधारकांना दंड भरण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे शनिवारी लोकअदालतीमध्ये हजर राहण्यास कळविण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी गुरुवारी (दि.११) सांगितले. अधिक माहितीनुसार, राज्यात वन स्टेट वन ई-चलानअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र वाहनधारक दंड वेळेवर भारत नसल्याने प्रलंबित ई-चलानची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुकले दंडाची वसुली करण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण सेवा व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समन्वयाने शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे दंड प्रलंबित आहे, त्यांनी शनिवारपूर्वी भरणा करावा, अन्यथा त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे एसीपी भुजंग यांनी पत्रकात म्हटले आहे.
वाहतूक पोलिसांच्या ई-चलान मशीनवर, ऑनलाईन, वेबसाईट तसेच महा ट्राफिक अॅपवरही दंडाची रक्कम भरता येते. तसेच नोटीसच्या शेवटच्या पानावर तडजोड रक्कम, दंड रक्कम भरण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.