Financial scam in ST rest house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या वर्ग व एक व दोन क्रमांकाच्या अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विश्रामगृहात आर्थकि घोटाळा झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. याची सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल पाठवला होता. या अहवालानुसार या प्रकरणी खानसामा शेख मोहम्मद इमरान शेख जिलानी हे दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच वरिष्ठ कार्यर्यालयाकडून आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
एसटीच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहाची जबाबदारी पूर्णपणे खानसामा शेख मोहम्मद इमरान शेख जिलानी यांच्याकडे होती. त्या ठिकाणी मुक्कामी आलेल्या अधिकाऱ्यांकडून घेतलेली रक्कम वेळवर जमा न करणे, तसेच मुक्कामी अधिकाऱ्यांची नोंद न करताच त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी प्रकार नुकतेच समोर आले होते.
या प्रकरणी लेखा अधिकारी दाभाडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून सुरक्षा व दक्षता अधिकारी विक्रम भोसले यांनी प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत खानसामा शेख मोहम्मद इमरान शेख जिलानी दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला. या अहवालाच्या आधारे नुकतेच वरिष्ठ कार्यालयांकडून कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत.
तीन महिन्यांत कारवाईचे आदेश
एकीकडे पाच रुपयांच्या आर्थकि हेराफेरीप्रकरणी वाहकांना तात्काळ निलंबित किंवा इतर कारवाई केली जाते. तर दुसरीकडे हजारो रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही दोषीवर कारवाईसाठी तीन महिन्यांचा कालावधी दिल्याने हे प्रकरण वरिष्ठांकडून दावण्याचा प्रयत्न सुरू असून, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या विश्रामगृहाची सुविधा घेतली आहे, त्यांच्याकडेही संशयाची सुई फिरत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले असल्याची चचर्चा अधिकारी-कर्मचाऱ्यांत सुरू आहे.