Finally, work on the second road in MIDC has begun
राहुल जांगड़े
छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील रस्त्यांच्या दयनीय, दुरवस्थेबाबत दैनिक पुढारीने फाईव्ह स्टार नव्हे, स्लम औद्योगिक वसाहत ही वृत्त मालिका लावून धरली आहे. यामुळे प्रशासनासह रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांनाही चांगलेच हादरे बसत असल्याने एका ठेकेदाराने एमआयडीसीच्या प्रवेश मार्गाच्या दुरुस्तीचे काम २४ नोव्हेंबरपासून सुरू केले. हे काम अंतिम टप्प्यात असतानाच शुक्रवार (दि.२८) पासून डी ब्लॉकमधील दुसऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात झाली. दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याची ताकीद या ठेकेदारालाही देण्यात आली आहे.
औद्योगिक प्रगतीची नवी दारे खुली करणाऱ्या शेंद्रा कोट्यवधींच्या निधीतील रस्ते एमआयडीसीमधील निकृष्ट कामांमुळे काही महिन्यांतच उखडून गेले. या फाईव्ह स्टार इंडस्ट्रीची पुरती वाट लागली आहे. या औद्यागिक वसाहतीमधील एओपीक्यूआर या प्रवेश मार्गाचे ८ कोटी, ६७ लाखांच्या निधीतून गतवर्षी रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले होते.
मात्र हा रस्ता सहा महिन्यांत उखडल्याने जागोजागी खड्डे पडल्याने याविरोधात दै. पुढारीने सातत्याने वाचा फोडल्याने ठेकेदाराने २४ नोव्हेंबरपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. हे काम शेवटच्या टप्प्यात असतानाच शुक्रवारपासून रेडिको कंपनीसमोरील डी ब्लॉकमधील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दुसऱ्या ठेकेदाराने सुरू केले.
तब्बल ५ कोटी, १३ लाख १६ हजार ०७ रुपयांच्या निधीतून मे. मापारी इन्फो. यांनी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र काही महिन्यांतच या रस्त्याची वाताहत होऊन ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. निकृष्ट कामामुळे या रस्त्याचाही अक्षरशः धुराडा झाल्याचे वृत्त दै. पुढारीने प्रकाशित केले. याची तातडीने दखल घेत प्रशासनाने ठेकेदारालाही नोटीस बजावून काम सत् करण्याची तंबी दिली होती. अखेर शुक्रवारपासून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
उद्योजक, कामगारांकडून दै. पुढारीचे आभार
दै. पुढारीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच एमआयडीसीमधील एओपीक्यूआर आणि डी ब्लॉक या दोन्ही प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे खराब रस्त्यांचा त्रास कमी होणार असल्याने समाधान व्यक्त करत स्थानिक उद्योजक आणि कामगारांनी दै. पुढारीचे आभार व्यक्त केले.
रेडिको कंपनीसमोरील रस्त्यांचे कामही सुरू एमआयडीसीच्या ए, ओ. पी... या प्रवेश मार्गाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारपासून रेडिको कंपनीसमोरील दुसऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. आधी सगळे खड्डे व्यवस्थित भरून घेत आहोत. रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळपासून डांबरीकरण सुरू होईल.-रामचंद्र. गिरी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.