Crime News : मैत्रिणीशी बोलण्याच्या रागातून जीवघेणा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मैत्रिणीशी बोलण्याच्या रागातून जीवघेणा हल्ला

देवगिरी कॉलेज जवळील घटना, तीन आरोपी गजाआड

पुढारी वृत्तसेवा

Fatal attack in anger over talking to girlfriend

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तू तिच्यासोबत का बोलतो आणि तिला का भेटतो? याचा जाब विचारत देवगिरी महाविद्यालयाच्या मागील गेटजवळ एका २२ वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.१) दुपारी घडली. वेदांतनगर पोलिसांनी गुरुवारी (दि.२) तिन्ही विद्यार्थी आरोपींना नक्षत्रवाडी भागातून बेड्या ठोकल्या.

निखिल साळवे (२१, रा. जाफराबाद, जालना, ह.मु. वडगाव कोल्हाटी), विवेक शेलार (१९, रा. वडगाव कोल्हाटी) आणि अवी पाटील (२०, रा. खुलताबाद, ह.मु. शहानुरवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. तिन्ही आरोपी बीसीए प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. तर इम्रान हबीब शेख (२२, रा. जमालनगर, देवळाई) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी इम्रान हा फार्मसीचे शिक्षण घेत असून, तो एका तरुणीच्या घराजवळ राहतो. त्यामुळे त्या दोघांची पूर्वीपासून चांगली मैत्री आहे. मात्र ही मैत्री आरोपी निखिल साळवे याला खटकत होती. निखिल आणि त्याचे मित्र उस्मानपुरा भागातील एका महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतात आणि ती तरुणीही त्यांच्यासोबतच शिकते. दोन महिन्यांपूर्वी निखिलची तरुणीसोबत मैत्री झाली होती. तेव्हापासून तू तिच्याशी बोलू नको, असे निखिलने इम्रानला अनेकदा बजावले होते. बुधवारी निखिलचा पेपर असतानाही त्याने तो बुडवला आणि आपल्या खोलीवर इम्रानला मारण्याचा कट रचला.

हल्ला केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आणि त्यांनी नक्षत्रवाडी भागातील एका बांधकाम साईटवर आश्रय घेतला. पोलिस निरीक्षक यादव यांनी शोध मोहीम राबवली. तिघांना उपनिरीक्षक नामदेव सुपे, संगीता गिरी, अंमलदार मनोज चव्हाण, गजानन शेळके, राजूसिंग सुलाने, प्रवीण मुळे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. पुढील तपास उपनिरीक्षक गिरी करत आहेत.

मोबाईलवरून कॉल अन् चाकूने वार

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास निखिल त्यांचे मित्र विवेक आणि अवी यांच्यासोबत कॉलेजजवळ आला. त्याने तरुणीच्या मोबाईलवरून इम्रानला कॉल केला आणि तू कॉलेजकडे येतो की मी तिकडे येऊ, अशी धमकी दिली. त्यामुळे इम्रान तेथे पोहोचला. दुपारी ४:१० वाजेच्या सुमारास तिन्ही आरोपींनी इम्रानला महाविद्यालयाच्या मागील गेटजवळच्या गल्लीत नेले. तिथे विवेक आणि अवी यांनी चिथावणी दिल्यानंतर निखिलने त्याच्याजवळ लपवून ठेवलेला चाकू काढून इम्रानला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर आणि डाव्या कानावर सपासप वार केले. यात इम्रान रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT