Sambhajinagar News : खरेदीखतात खाडाखोड करून हडपली कोट्यवधींची शेतजमीन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : खरेदीखतात खाडाखोड करून हडपली कोट्यवधींची शेतजमीन

कचनेरमधील ७ एकर जमिनीचा फेरफार; महसूल कर्मचाऱ्यांशी संगनमत करून फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Farmland worth crores was grabbed by tampering with the purchase deed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दुय्यम निबंधक कार्यालयातील १९९६ च्या अधिकृत नोंदणीकृत खरेदीखतात खाडाखोड करून, मूळ खरेदीदाराचे नाव खोडून स्वतःचे नाव टाकणे आणि वयात फेरबदल करून दुसऱ्याची तब्बल ७ एकर शेतजमीन स्वतःच्या नावे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही नोटीस न देता परस्पर ७/१२ उताऱ्यावर नाव चढवून ही कोट्यवधींची जमीन हडप करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात शनिवारी (दि.१७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचनेर तांडा क्र. ६ येथील रहिवासी व सध्या बंजारा कॉलनी, खोकडपुरा येथे राहणारा संशयित देवीदास श्यामा राठोड, दस्तऐवजावर खोटी साक्ष देणारे राजू तुकाराम मोरे, सुभाष पुंडलिकराव तांगडे आणि संबंधित तत्कालीन महसूल कर्मचारी अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी शेतकरी रमेश देवीदास राठोड (४९ रा. कचनेर तांडा क्र. ५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मौजे कचनेर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गट क्र. २६६ मधील ७ एकर शेतजमीन कडू मंजू राठोड आणि धोडीराम भोजीराम राठोड यांच्याकडून रमेश राठोड आणि त्यांचे सख्खे बंधू जवाहरलाल देवीदास राठोड यांनी प्रत्येकी ३ एकर २० गुंठे अशी मिळून २२ एप्रिल १९९६ रोजी खरेदी केली होती. दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ येथे दस्त क्र. १११२/१९९६ अन्वये नोंदणीकृत खरेदीखत करण्यात आले. त्याआधारे तलाठी कार्यालयात फेरफार क्र. १३९७ नुसार ७/१२ उताऱ्यावर दोघा भावांची नावे लागली होती. दरम्यान, १२ सप्टेंबर १९९९ रोजी जवाहरलाल राठोड यांचे अकाली निधन झाले.

बंधूच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी देवीदास श्यामा राठोड याने या जमिनीवर डोळा ठेवून कट रचला. त्याने १९९६ च्या मूळ नोंदणीकृत खरेदीखतात खाडाखोड केली. दस्तऐवजातील जवाहरलाल देवीदास राठोड या नावावर चक्क रेषा मारून ते नाव खोडले आणि त्याजागी देवीदास श्यामा राठोड असे नाव घुसडले. एवढेच नव्हे, तर जवाहरलाल यांचे वय खरेदीच्या वेळी १९ वर्षे असताना, १९ मधील १ आकड्याचा ३ करून वय ३९ वर्षे भासवले.

तलाठ्याला हाताशी धरून परस्पर फेरफार

देवीदास श्यामा राठोड हा कचनेर तांडा क्र. ६ चा रहिवासी असताना, तत्कालीन तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता आणि मूळ वारसांना पूर्वसूचना न देता, या बनावट खाडाखोड केलेल्या दस्ताच्या आधारे फेरफार क्र. १५८८ मंजूर करून देवीदासचे नाव ७/१२ उताऱ्यावर चढवले. यानंतर आरोपीने मयत भावाची ३ एकर २० गुंठे जमीन देवळाई येथील दोघांना विकली, तर उर्वरित जमीन स्वतःच्या नावावर करून बनावट दस्ताच्या आधारे २००५ मध्ये (दस्त क्र. ४६६२/२००५) स्वतःचा मुलगा राजाराम राठोड याच्या नावे विक्री दाखवली.

यासाठी राजू मोरे आणि सुभाष तांगडे यांनी खोटी साक्ष दिली. राजारामच्या मृत्यूनंतर ही जमीन त्याच्या पत्नीच्या नावे करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT