Farmers relieved by the break in the rains
वेरुळ, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे आजमपूरसह वेरूळ, गल्लेबोरगाव, पिंपरी, तिसगाव व परिसरातील खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतशिवार हिरवाईने नटले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सलग पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला आहे. पिकांच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकरी शेतात उतरले असून कीटकनाशक फवारणी, तणनियंत्रण, वरखताची मात्रा देणे, आंतरमशागत व इतर शेतीकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने ही कामे अधिक प्रभावीपणे होत आहेत.
मात्र, पावसानंतर वाढलेल्या आर्द्रतेमुळे विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर किटकनाशक फवारणी केली जात असून अनेक गावांमध्ये फवारणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे फवारणी करणाऱ्या मजुरांची मागणी वाढली असून मजुरीचे दरही वाढले आहेत.
काही ठिकाणी मजूर सहज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अधिक मोबदला देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत. दरम्यान, दमदार पावसामुळे परिसरातील शेततळी, विहिरी व नाल्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही हवामान अनुकूल राहिल्यास यंदा खरीप पिकांचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.