Flood Affacted Farmers Agitation
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि.२१) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात चटणी भाकरी खावून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनावेळी पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटही झाली.
यंदा अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना मदत म्हणून सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले. तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु अजूनही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले. अर्धनग्न होऊन आणि दारात बसून चटणी भाकर खात शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदविला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बेगमपुरा पोलिसांनी जबरदस्तीने वीस ते पंचवीस आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ झटापटही झाली. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, राजू बोंगाणे, शिवाजी धरफळे, यादवराव कांबळे, गणपत खरे, पुरण सनान्से आदी सहभागी होते.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पडले असते, तर शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिवाळी साजरी करता आली असती. पण तसे झाले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या लेकराबाळांच्या तोंडातील गोडघास हिरावून घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आंदोलक शेतकऱ्यांप्रती संवदेनशीलता दाखविली नाही. त्यांनी शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याचे काम केले.- कृष्णा साबळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना