Farmers' opposition to land acquisition for Auric
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डीएमआयसी-ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील भूसंपादनासाठी खोडेगाव येथील शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२६) आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी प्रस्तावित भूसंपादनासाठी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला. अनेक शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवल्याने प्रशासनासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.
उद्योगनगरीतील जमीन आटल्याने शासनाने ऑरिक-डीएमआयसीच्या विस्तारासाठी खोडेगाव, पाडळी, निलजगाव, घारदोन, घारदोन तांडा व गाडीवाट या गावातील सुमारे ८ हजार एकर शेतजमीन संपादित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने खोडेगावातील शेतकऱ्यांनी डीएमआयसी विरोधी शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक पार पडली.
यात प्रस्तावित भूसंपादनासाठी एकही इंच जमीन सरकारला न देण्याचा पवित्रा उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला. मात्र, जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बैठक निष्फळ ठरली. यावेळी नितीन पाटील खोडेगावकर, तालुका पंचायत समितीचे सभापती कल्याण गायकवाड, प्रशांत ढगे, सुधाकर ढगे, योगेश ढगे, गणेश ढगे, सतीश ढगे, सरपंच नारायण डिघोळे, नारायण हुलसार, बाळु डिघोळे, साईनाथ ढगे, अमोल ढगे यांच्यासह खोडेगाव येथील २५० शेतकरी उपस्थित होते.
सुपीक जमिनीचे भूसंपादन करु नये : दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी खोडेगाव येथील शेत जमिनीच्या प्रस्तावित भूसंपादनास आमचा तीव्र विरोध आहे. ही शेतजमीन बागायती सुपीक व बहुपीक पद्धतीची आहे. या जमिनीवर पिढ्यानपिढ्या आमचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या सुपीक जमिनीचे भूसंपादन करू नये अशी आमची प्रमुख मागणी आहे. खोडेगावातील एक इंच ही जमीन देणार नाही, हीच आमच्या गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची ठाम भूमिका असल्याचे नितीन पाटील खोडेगावकर यांनी सांगितले.