Gangapur News : शेतकऱ्याची दीड लाखाची बॅग हिसकावली file photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur News : शेतकऱ्याची दीड लाखाची बॅग हिसकावली

सोने गहाण ठेवून घेतले होते दोन लाख; भाच्याला ५० हजार दिल्यानंतर दुचाकीस्वारांनी साधला डाव

पुढारी वृत्तसेवा

Farmer's bag containing ₹1.5 lakh snatched

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : सोने गहाण ठेवून घेतलेले दोन लाख रुपये घेऊन बुलढाणा अर्बन पतसंस्थेतून बाहेर पडलेल्या ६० वर्षीय शेतकऱ्याच्या हातातील पैशांची बॅग दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी हिसका देत लंपास केली. बॅगेत दीड लाख रुपये होते. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लासूरनाका चौकातील बुलढाणा अर्बनसमोर घडली.

विनायक पुंजाराम गोरे (६०, रा. सोलेगाव, ता. गंगापूर) यांनी शनिवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता सोने गहाण ठेवून पतसंस्थेतून दोन लाख रुपये घेतले. त्यापैकी ५० हजार रुपये भाचा प्रमोद पवार यांना देणे असल्याने त्यांनी फोन करून त्यांना बँकेसमोर बोलावले.

दुपारी १२.२२ वाजता गोरे यांनी भाच्याला ५० हजार रुपये दिले. उर्वरित दीड लाख रुपये बॅगेत ठेवून गोरे मोटारसायकलकडे जात असताना दुपारी १२.२५ ते १२.३०च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली.

त्यानंतर दोघे भेंडाळा फाट्याच्या दिशेने पसार झाले. दुचाकी चालविणारा तरुण सडपातळ बांध्याचा असून, त्याने काळा शर्ट, फुल पॅन्ट व हेल्मेट घातले होते. मागे बसलेल्या तरुणाने काळा शर्ट, फुल पॅन्ट आणि लाल टोपी घातली होती. दोघांचेही वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे गोरे यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी गोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. तपास पोउनि मधुकर मोरे करीत आहेत.

अवघ्या ३ मिनिटांत डाव

१०.४५ वा. - सोने गहाण ठेवून दोन लाख रुपये घेतले

१२.२२ वा.- भाच्याला ५० हजार रुपये दिले

१२.२५ ते १२.३० वा.-दुचाकीस्वारांनी बॅग हिसकावली

चोरीची रक्कम : १ लाख ५० हजार रुपये

संशयित : दोन अनोळखी दुचाकीस्वार

पसार होण्याचा मार्ग : भेंडाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT