छत्रपती संभाजीनगर : केंब्रिज चौकात सोमवारी (दि. २९) झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत चारही दिशांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. जालना रोड, बीड रोड, सावंगी बायपास आणि शेंद्रा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागला, तर तीन तास शहरातील वाहतूक विस्कळित झाली होती. यासह काही ठिकाणी वाहतुकीच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे, यामागणीसाठी सोमवारी (दि.२९) केंब्रिज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी प्रथम खासदार सुप्रिया सुळे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या देणारे माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि इतर नेत्यांना शहर बसमध्ये बसवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हलविण्यात आले, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकर्त्यांना टप्प्याटप्प्याने हटविण्याची रणनीती राबविण्यात आली.
दरम्यान, आ. पवार शेवटपर्यंत आंदोलनस्थळी ठाम राहिले. त्यामुळे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले व निरिक्षक अविनाश आघाव यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरकारकडून चर्वेचे आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याची घोषणा आ. पवार यांनी केली.
दरम्यान सकाळपासून दुपारपर्यंत तैनात असलेल्या पोलिसांना आणि महिला कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतागृहाच्या अभावी अडचणींचा सामना करावा लागला. तसेच आंदोलन संपल्यानंतरही काही काळ झाल्टा फाटा व बीड बायपासकडील वाहतूक पूर्ववत करण्यात विलंब झाला. त्यामुळे एसटी बस आणि खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय झाली.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, डॉ. नरेंद्र काळे, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दिन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, प्रा. किशोर पाटील यांच्यासह शेतकरी, कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाहतूक अशी वळविली
आंदोलनावेळी जालना रोड, बीड रोड, शेंद्रा आणि सावंगी बायपासवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. आंदोलन संपल्यानंतरही काही काळ वाहतूक पूर्ववत झाली नाही. त्यामुळे एसटी बससह इतर वाहनांना बीड बायपासमार्गे वळसा घ्यावा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.