छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महसूल विभागाच्या परस्पर बोगस तलाठी भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना तलाठी पदाचे नियुक्ती आदेश देण्यात आले. शहरात एका ठिकाणी रीतसर प्रशिक्षण दिले. तसेच तहसीलच्या आवारात या तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटपही करण्यात आले. फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोणतीही तलाठी भरती सुरू नाही, त्यामुळे लोकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाच्यावतीने सन २०२३ मध्ये टीसीएस कंपनीमार्फत तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरतीकरिता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्हा निवड समिती छत्रपती संभाजीनगरसाठी १५४ पदांची जाहिरात देण्यात आली होती. परीक्षेनंतर १४४ जणांना प्रत्यक्ष नियुक्ती देण्यात आली. मात्र आता अचानक जिल्ह्यात पुन्हा तलाठी भरतीचा प्रकार समोर आला आहे. परंतु ही भरती बोगस धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींच्या मार्फत भूलथापा देऊन तलाठी निवडीचे आदेश देऊन फसवणुकीचे प्रकार होत असल्याचे निदर्शन आले आहे.
विशेष म्हणजे या उमेदवारांना शहरात रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना तहसीलच्या आवारात आणून लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. या उमेदवारांकडून लाखो रुपये वसूल केल्याचीही चर्चा आहे. सन २०२३ च्या तलाठी भरती व्यतिरिक्त कुणालाही ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) निवडीचा कुठलाही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला नाही. तलाठी पदभरती २०२३ ची मुदत संपल्याने अज्ञात व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात अज्ञातांकडून अनेकांना तलाठी भरतीच आदेश दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणज यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील काह अधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांचीही फसवणूक झाल्यान स्पष्ट होत आहे. सुरुवातीला संबंधितांनी ही तलाट भरती बोगस असल्याचे सांगितल्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नसल्याचे समजते.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची सतर्कता
बोगस तलाठी भरतीचा प्रकार अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आला. अडकुणे यांना नांदेड जिल्ह्यातून त्यांच्या निकटवर्तीयांचा फोन आला, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याची छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी म्हणून निवड झाल्याचे सांगितले. परंतु जिल्ह्यात तलाठी भरती सुरूच नसल्याने अडकुणे यांना संशय आला. त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली व ही बाब निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांच्या कानावर टाकली.
पोलिसांना दिली माहिती
तलाठी भरतीच्या नावावर फसवणूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.