Fake PMO secretary caught at wedding during CM's visit
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या लग्न सोहळ्यात जाणार होते, तिथे प्रधानमंत्री कार्यालयाचा (पीएमओ) सचिव, नीती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून सुटाबुटात शिरलेल्या तोतया अधिकाऱ्याला सतर्क शहर पोलिस अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. ही घटना रविवारी (दि. १६) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास हॉटेल ग्रैंड सरोवर, तीसगाव भागात घडली. अशोक भारत ठोंबरे (४५, रा. दिल्ली, ह. मु. उंदरी, ता. केज, जि. बीड) असे तोतयाचे, तर त्याचा बॉडीगार्ड म्हणून पेहराव करून सोबत फिरणारा विकास प्रकाश पांडागळे (रा. पुणे) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, धुळे-सोलापूर हायवेवरील हॉटेल ग्रैंड सरोवर, तीसगाव येथे एक लग्न सोहळा होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याने पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले, एसीपी भागीरथी पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, शिवचरण पांढरे, एपीआय संजय गित्ते, सागर पाटील, विशेष शाखा, गुन्हे शाखेचे अधिकारी बंदोबस्तासाठी हजर होते. अचानक स्टेजवरील व्यक्तीने माइकवरून स्वागतासाठी प्रधानमंत्री कार्यालयाचे सचिव अशोक ठोंबरे यांचे नाव पुकारले. शहरात पीएमओ कार्यालयाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी येणार असल्याची सूचना पोलिसांकडे नसल्याने त्यांना संशय आला.
उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोंबरेला बोलावून घेत चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने नीती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले. त्याच्याकडे पीएमओ कार्यालयाचे ओळ खपत्र नव्हते. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून विकास पांडागळे फिरत होता. त्याच्याशी चौकशी केली असता दोघेही तोतयागिरी करत असल्याचे उघड झाले. दोघेही इनोव्हा कार (एमएच-१२-एसएन-९८९२) चालक विजय बोरले. सोबत आले होते. सुधीर चौधरी (रा. सावळेश्वर पैठण, केज) आणि शैलेंद्र चौहान (रा. अंबाजोगाई, ह. मु. मायवर्ड, चिकलठाणा) यांनी आरोपी ठोंबरे प्रधानमंत्री भारत सरकार कार्यालयाचा सेक्रेटरी आहे, असे त्याची ओळख असल्याचे सांगितले. पोलिसांनी कार जप्त करून ठोंबरे आणि पांडागळेला एमआयडीसी वाळूज ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला.
भारत सरकारची पाटी, तिरंगा ध्वज
पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत भारत सरकार लिहिलेल्या दोन पाट्या, कारवर तिरंगा ध्वज, एक चॉकलेटी सुटकेस मिळून आली. ठोंबरेने महिनाभरापूर्वी दिल्ली येथे बनवून पांडागळेला पुणे येथे कुरियरने पाठवून दिल्या होत्या, अशी कबुली दिली. मोबाईल नंबर व्हीव्हीआयपी, सूट, बूट, शूज, ब्रिफकेस असा पेहराव करून बऱ्याच दिवसांपासून लोकांची फसवणूक करत फिरत असल्याचे तपासात समोर आले.