छत्रपती संभाजीनगर : वर्षभरासाठी बटाईने दिलेली जमीन (४ हेक्टर ५९ आर) बनावट इसारपावती तयार करून ती हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेती विक्रीच्या व्यवहाराविनाच खोट्या सह्या करून ४५ लाख ९० हजार रुपयांची बनावट इसार पावतीआधारे न्यायालयात खरेदीखत करून मिळण्यासाठी दिवाणी दावा दाखल करण्यात आला.
हा प्रकार १२ जुलै २०२३ ते २५ जून २०२६ दरम्यान विहामांडवा (ता. पैठण) येथे घडला. या प्रकरणी वसीम मुस्तफा शेख, साक्षीदार आनंद आसाराम म्हात्रे, कयामत नुरा शेख (सर्व रा. विहामांडवा, ता. पैठण) यांच्या विरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावीर चुनीलाल कासलीवाल (५६, रा. वेरूळ) यांच्या नावावर विहामांडवा येथे गट क्रमांक ४२३ मध्ये ४ हेक्टर ५९ आर शेती आहे. कोरोना काळात ही शेती वसीम मुस्तफा शेख याला एका वर्षासाठी बटाईने दिली होती. २०२२-२३ मध्ये त्यांनी शेतीचा ताबा परत घेतला. कासलीवाल २ एप्रिल २०२३ रोजी ट्रॅक्टरने नांगरणी करत असतांना त्याला वसीम शेख याने शेतीचा व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय नांगरणी करू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
याबाबत कासलीवाल यांनी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वसीम शेख याने आपल्या पत्नीमार्फत आपल्याविरोधात खोटी तक्रार दिल्याचे कासलीवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
३० लाख दिल्याचा दावा
१२ जुलै २०२३ रोजी वसीम शेख यांनी वकिलामार्फत कासलीवालला नोटीस पाठवली, त्यात ३ मे २०२१ रोजी प्रतिएकर चार लाख रुपये दराने ४५.२० लाख रुपयांचा इसार करार झाल्याचा दावा केला. त्यापैकी ३० लाख रुपये रोख दिल्याचे नमूद करण्यात आले. मात्र असा कोणताही करार केला नसून, संबंधित इसारपावती पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत महावीर कासलीवाल यांनी नोटीसला उत्तर दिले.
दिवाणी दावा दाखल
६ सप्टेंबर २०२३ रोजी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात खरेदीखत करून मिळण्यासाठी व कायमस्वरूपी मनाई हुकूमासाठी दावा दाखल करण्यात आला. न्यायालयातून कागदपत्रांची प्रत मिळाल्यानंतर करारनाम्यावरील सही बनावट असल्याचे कासलीवाल यांच्या निदर्शनास आले. चेलीपुरा येथील नोटरी कार्यालयात बनावट इसारपावती तयार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अजित दगडखैर करीत आहेत.