Extortion was demanded by threatening to implicate him in the crime of illegal gas refilling
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील सिटी चौक भागात गॅस दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला तुझ्या दुकानात अवैध गॅस रिफिलिंग चालते, तुझी पोलिसांत तक्रार करून तुला जेलमध्ये पाठवते, अशी धमकी देत तब्बल ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी ज्योती जगधने, गणेश शिंदे, दोन अनोळखी अशा चौघांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदेच्या नावाने खंडणी मागणाऱ्या सुनील राजाराम माळी (३२, रा. कन्नड) याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
फिर्यादी शेख फय्याज शेख इब्राहिम (३८, रा. बारुदगर नाला) यांचे सिटी चौक परिसरात महाराष्ट्र गॅस रिपेअरिंग नावाचे दुकान आहे. २३ मे रोजी ज्योती जगधने ही महिला त्यांच्या दुकानात गॅस शेगडी दुरुस्त करण्यासाठी आली होती. दुरुस्तीचे ४२० रुपये तिने ऑनलाईन दिले, मात्र त्याच रात्री ती गणेश शिंदे याला सोबत घेऊन पुन्हा दुकानात आली.
फिर्यादीसोबत वाद घालायला सुरुवात केली. तुझ्या दुकानात अवैध गॅस रिफिलिंग चालते, तुझी पोलिसांत तक्रार करून तुला जेलमध्ये पाठवते, अशी धमकी देत तिने दर महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच दुकान सुरू ठेवायचे असेल तर दरमहा १५ हजार हप्ता द्यावा लागले, असे धमकवले. वारंवार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून पैशासाठी तगादा लावला. फय्याज यांनी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर सपोनी मनोज शिंदे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी लावला सापळा
मंगळवारी सकाळी आरोपीने पुन्हा पैशासाठी फोन केला. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांनी फय्याज आणि त्यांच्या भावाला आरोपींशी फोनवर बोलण्यास सांगितले. सध्या ३० हजार रुपये देतो, उरलेले २० हजार ईद झाल्यानंतर देतो, असे सांगून सौदा ठरवला. त्यावर आरोपींनी एका मोबाईल नंबरवर पैसे पाठवण्यास सांगितले. पोलिसांनी नंबरची खात्री करण्यासाठी प्रथम फोन-पेवरून एक रुपया पाठवला. रक्कम जमा झाल्याचे निश्चित होताच पोलिसांच्या उपस्थितीत ३० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. व्यवहार पूर्ण झाल्यावर आरोपींकडून थैंक यू, असा मेसेजही आला. हा सर्व ऑनलाईन व्यवहार पोलिसांनी पंचनाम्यात नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे.