Expansion of Chikalthana Airport News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. प्राथमिक अधिसूचनेवर दाखल सर्व हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणार होती, परंतु ऐनवेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने भूसंपादनाच्या क्षेत्रात किंचित बदल केला आहे. त्यामुळे आता भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे.
चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी मोठ्या क्षमतेची विमाने उतरण्यासाठी अपुरी पडत आहे. म्हणून शासनाने धावपट्टीची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १३९ एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी शासनाने मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात ७३४ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. या भूसंपादनासाठी छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी ८ जानेवारी २०२५ रोजी कलम ११ (१) नुसार ५८ हेक्टरची भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनंतर ३०० पेक्षा अधिक आक्षेप, हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या. त्या सर्वांवर सुनावणी घेण्यात आली. वन विभाग, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम या विभागांकडून बाधित मालमत्तांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली.
आता कलम १९ ची अंतिम अधिसूचना जारी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. परंतु महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने संपादित करावयाच्या क्षेत्रात किंचित बदल सुचविला आहे. कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यात प्रस्तावित १३९ एकर जागेपैकी १.५ एकर जागा वगळणे तसेच दुसऱ्या गटात ०.१६ एकर जागा वाढविण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने भूसंपादनाची सर्व प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. परिणामी, गेल्या आठ महिन्यांपासून प्रशासनाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. शिवाय हे भूसंपादन आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी सुमारे ७३४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत त्यापैकी २५२ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी तीन टप्प्यांत मिळाला आहे. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या विस्तारीकरणासाठी चिकलठाणा, मुर्तजापूर, मुकुंदवाडी या गावांतील मालमत्तांचे संपादन करण्यात येणार आहे. यात चिकलठाण्यातील एकूण ४४ गट, मुर्तुजापूर मधील ४ तर मुकुंदवाडीतील ८ गटांचा समोवश आहे.
विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. परंतु विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित जागेपैकी किंचित जागा वगळण्याबाबत आणि काही नवीन जागा वाढविण्याबाबत सूचित केले आहे. त्यात पुरेशी स्पष्टताही नाही. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे.डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी.