

Rickshaw driver runs over woman's feet
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचे भाडे देण्यावरून वाद झाल्यानंतर मुजोर रिक्षाचालकाने प्रवासी महिलेला रिक्षातून खाली ढकलून दिल्याने ती जखमी झाली. त्यानंतरही त्याने तिच्या डाव्या पायावरून रिक्षा घालून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी सव्वासातच्या सुमारास मोंढा नाका सिग्नलवर घडली.
फिर्यादी नंदा दादासाहेब शिरसाठ (३८, रा. शिवशंकर कॉलनी) या आरोपीच्या शेअरिंग रिक्षात बसल्या होत्या. सेव्हन हिलकडून रिक्षा मोंढा नाका सिग्नलवर आल्यावर रिक्षाचे भाडे देण्यावरून रिक्षाचालकाने नंदा यांच्याशी वाद घातला. त्यांना अरेरावी करत रिक्षामधून खाली ढकलून दिले. नंदा या रिक्षातून पडल्याने त्यांच्या हाताला मार लागला. त्यानंतरही मुजोर रिक्षाचालकाने सुसाट रिक्षा त्यांच्या पायावरून घातली. यात नंदा यांच्या डाव्या पायाला गंभीर मार लागला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरात लाखो रुपये खर्चुन बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कुचकामी ठरत आहेत. त्यात वाहनाचे नंबरही स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे हा पैसा पाण्यात गेला आहे. जवाहरनगर पोलिसांना विचारले असता त्यांनी रिक्षाचा नंबर अस्पष्ट असल्याचे सांगून हतबलता दर्शवली.