Everyone's contribution is important for planning the Kumbh Mela in Paithan
पैठण, पुढारी वृत्तसेवा: नाशिकच्या धर्तीवर दक्षिण काशी पैठण येथील कुंभमेळासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून साधूसंतांच्या शाही स्नानसोहळा वेळेस गोदावरी स्वच्छता मोहीम सुरू करण्याच्या सूचना शनिवारी दि. १६ रोजी कुंभमेळा नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार विलासबापू भुमरे यांनी दिले आहे.
संताची पावन भूमी व दक्षिणकाशी पैठणनगरी असल्यामुळे या ठिकाणी कुंभमेळा काळात गोदावरीचे शाही स्नान करण्यासाठी हजारो साधू संत व भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दरवर्षी येतात. येणारा कुंभमेळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शनिवारी रोजी श्रीसंत एकनाथ महाराज समाधी मंदिरात कुंभमेळा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी विविध मान्यवरांनी गोदावरी शाही स्नान घाटावर येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सूचना मांडल्या यामध्ये पैठण गोदावरी नदीवर येण्या जाण्यासाठी असलेले शहरातील अंतर्गत रस्त्यांसह शहरातील साफसफाई ठेवून गोदावरी नदी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू करण्याची सूचना या कुंभमेळा नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार विलासबापू भुमरे यांनी संबंधित प्रशासनाला दिले. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी लवकरच आराखडा तयार करून स्नानसाठी येणाऱ्या प्रत्येक साधूसंत व भाविकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ
आमदार विलासबापू भुमरे यांनी कुंभमेळा नियोजन आढावा बैठक घेतली. यावेळी मात्र तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन विभागाचे आगारप्रमुख यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून आले आहे.