Enthusiastic response to Mahmoodpura Heritage Walk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबर यांनी उभारलेली नहर-ए-अंबरीची जलव्यवस्था, महमूदपुरातील ऐतिहासिक मकबरा, नीलकंठेश्वर मंदिर आणि राजपूत छत्री स्थापत्यशैलीतील बारादरीचा इतिहास रविवारी (दि.३०) नागरिकांसमोर उलगडला.
मलिक अंबर यांच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त इंटॅक छत्रपती संभाजीनगर चॅप्टर आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महमूदपुरा हेरिटेज वॉक घेण्यात आला. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वॉकची सुरुवात नहर-ए-अंबरीच्या प्रमुख स्थळांपैकी एक असलेल्या गोमुख येथून झाली.
तत्कालीन खडकी शहराच्या नियोजनबद्ध विकासात मलिक अंबर यांची भूमिका आणि शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी विकसित केलेली नहर-ए-अंबरी यावेळी समजावून सांगण्यात आली. सुमारे चार शतकांपूर्वीची ही जलव्यवस्था तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्य आणि नगरनियोजनाची साक्ष देत असल्याचे इतिहास अभ्यासकांनी सांगितले. इंटॅकचे सह-संयोजक अॅड. स्वप्निल जोशी यांनी प्रास्ताविक केले.
शहरातील प्रसिद्ध स्मारकांपलीकडे जुन्या वस्त्यांमध्ये विखुरलेला ऐतिहासिक व स्थापत्य वारसाही तितकाच महत्त्वाचा असून, त्याचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, नगरसेवक राजगौरव वानखेडे, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, पर्यटन विभागाचे उपआयुक्त अंकुश पांढरे, सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
महमूदपुराचा वारसा दुर्लक्षितच
महमूदपुरा परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही शहराच्या सर्वसामान्य चर्चेपासून दूर आहेत. नहर-ए-अंबरीसारखी ऐतिहासिक जलव्यवस्था, मकबरा, मंदिर आणि बारादरी यामुळे या परिसराला स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा वारशाचे जतन करण्यासाठी नागरिक, महापालिका आणि वारसा संवर्धन संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज हेरिटेज वॉकच्या निमित्ताने पुढे आली आहे.