शहानुरमिया दर्गा रस्त्याने घेतला मोकळा श्वास file photo
छत्रपती संभाजीनगर

शहानुरमिया दर्गा रस्त्याने घेतला मोकळा श्वास

भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले, आंदोलनानंतर मनपाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Encroachments by vegetable vendors on Shahanurmiya Dargah Road have been cleared.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिग्मा, वरद हॉस्पिटलपासून ते सूतगिरणी-शहानुरमिया दर्गा रोडवर रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला विक्री करणाऱ्यांना हटवा, या मागणीसाठी सोमवारी स्थानिक नागरिकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर महापालिकेच्या पथकाने विक्रेत्यांना हटवून साहित्यासह भाजीपाला जप्त केला. त्यामुळे पीर बाजार असतानाही सोमवारी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली.

वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल रस्त्यावर दोन्ही बाजूंनी त्यासोबतच सोमवारी पीर बाजारच्या दिवशी सूतगिरणी ते शहानुरमिया दर्गा या रस्त्यावर एका बाजूने मोठ्याप्रमाणात भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. महापालिकेने अनेकवेळा या रस्त्यावर कारवाई करून विक्रेत्यांना हसुकावून लावले आहे. तरीही रस्त्यावर हातगाड्या, वाहने उभी करून व्यवसाय केला जातो.

काही फळ विक्रेत्यांनी तर कायमस्वरूपी अतिक्रमणच केले आहे. ही अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा, यासाठी सतत या भागातील नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना निळकंठ यांच्यासह परिसरातील नागरिक महापालिकेकडे मागणी करीत आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच केले गेले.

अखेर सोमवारी भाजपच्या नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांच्यासह नागरिकांनी सकाळी ७ वाजताच या विक्रेत्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. याबाबत शैलेंद्र नीळकंठ यांनी सांगितले, मफरस्त्याच्या दोन्ही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांनी अतिक्रमणधारकांना रस्त्यावर बसू नका, म्हणून समजावून सांगितले.

मात्र बाजूंनी विक्रेत्यांनी त्यांनाच आरेरावी केली. आम्ही असे खूप नगरसेवक पाहिलेत, आमचे कोणी काहीच करू शकत नाही, असे म्हणत धमक्या दिल्या. हा प्रकारानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. जवाहनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन दिले. तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्या, नसता तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

पथक करते तरी काय ?

शहानुरमिया दर्गा परिसरातील महापालिकेच्या जागेत प्रत्येक सोमवारी पीर बाजार भरतो. असे असतानाही परिसरातील रस्त्यावर दररोज मोठ्याप्रमाणात भाजीपाला, फळविक्रेते अतिक्रमण करतात. याविरोधात नागरिक तक्रारी करूनही कारवाई होत नाही. तेव्हा वॉर्डनिहाय महापालिकेचे अतिक्रमण हटाव विभाग नेमके करते तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT