Encroachment in front of the railway station demolished
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून रेल्वेस्टेशन समोरील अतिक्रमणावर बुधवारी (दि.९) बुलडोझर चालवण्यात आले. यात चार दशकांचा साक्षीदार असलेले हॉटेलही पाडण्यात आले आहे. त्यानंतर पथकाने पदमपुरा रोडवरील रस्त्यात बाधित ठरणारी बांधकामे भुईसपाट केली. यावेळी महावीर चौकातील अतिक्रमित बांधकामे पाडण्यात आली. महापालिकेकडून आज ११९ अतिक्रमण पाडण्यात आले.
शहरातील नवीन विकास योजनेनुसार महावीर चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याची रुंदी ३५ मीटर आहे. त्यानुसार दुभाजकाच्या एका बाजूने साडेसतरा मीटर आणि दुसऱ्या बाजूने साडेसतरा मीटरनुसार मार्किंग करण्यात आली. त्यानंतर रस्त्याला बाधित ठरणारी बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील मुख्य रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात ही कारवाई करण्यात येत आहे.
त्यामुळे महापालिकेने बुधवारी आपला मोर्चा रेल्वेस्टेशन ते महावीर चौक या रस्त्याकडे वळवला. यात चार दशकांच्या साक्षीदार असलेल्या रेल्वेस्टेशन समोरील जनता हॉटेलपासून कारवाईला करण्यात आली. या हॉटेललगतच्या धार्मिक स्थळाच्या दर्शनी भागातील दहा ते पंधरा दुकानांवरही पथकाकडून बुलडोझर चालवण्यात आले. तसेच आरटीओ कार्यालयासमोरील दुकानांवरही कारवाई करण्यात आली.
न्यायालयात धाव घेतलेल्या मालमत्ता वगळून कारवाई अयोध्यानगरी मैदानासमोरील मुख्य रस्त्यावरील बंगल्यांच्या संरक्षक भिंती रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहेत. मात्र हे सर्व बंगले बांधकाम परवानगी घेऊन बांधण्यात आलेले आहेत. मात्र बाधित होणारा संरक्षक भिंतीचा भाग संबंधित मालमत्ताधारकांना स्वतःहून काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला. तर काही मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली नाही.
यावेळी पथकांनी पदमपुऱ्यातील हनुमान मंदिरासमोरील मुख्य रस्त्यालगची आठ ते दहा दुकाने जेसीबीच्या सहाय्याने पाडली. यावेळी माजी महापौर गजानन बारवाल यांनी नागरिक स्वतःहून अतिक्रमण काढून घेत असल्याचे सांगत ज्या भागातील बांधकामे पाडली जात आहेत, तो भाग गावठाणचा असल्याचे नमूद केले. तर पथकाने पदमपुरा ते पंचवटी चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमित बांधकामे पाडली. त्यामुळे रेल्वेस्टेशन ते महावीर चौक रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
पदमपुरा रोडलगची रस्त्याला बाधित ठरणारी अतिक्रमण पथकाकडून हटवण्यात येत होती. यावेळी काही महिलांनी साहेब आमच्या घराची एक किंवा दोनच फूट जागा उरते, असे मनपाचे अतिक्रमण हटाव पथकाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांना विनंती केली. मात्र पाडापाडीची कारवाई सुरूच असल्याने महिलेसह परिवाराला रडू कोसळले.
महापालिकेकडून महावीर चौक ते रेल्वेस्टेशन रोडवर करण्यात आली आहे. आज गुरुवारी (दि.१०) महावीर चौक ते जालना रोडवरील एपीआय कॉर्नरपर्यंच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.