

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील ५ प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रोडवरील बेकायदा बांधकामे पाडण्याचा धडका सुरू केला आहे. परंतु, या पाडापाडीनंतर महापालिकेकडे सर्व्हिस रोडसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेचे शिष्टमंडळ केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. परंतु, गडकरींशी भेट न झाल्याने शिष्टमंडळाने ११०० कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडे केले.
शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पैठण रोडवरील नक्षत्रवाडी ते महानुभव आश्रम, जालना रोडवर केंब्रीज शाळा चौक ते सेव्हनहिल, जाळगाव रोडवर सिडको बसस्थानक ते हसूल, दिल्लीगेट ते हसूल, मुंबई हायवेवर पडेगाव ते दौलताबाद टी पाइंट आणि बीड बाय पासवर महानुभव आश्रम ते झाल्टा फाटा या रस्त्यांवर ४५ ते ६० मीटर रुंदीत येणारी बेकायदा बांधकामांवर महापालिकेने बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. यात आतापर्यंत चार हजारांवर मालमत्ता पाडण्यात आल्या आहेत.
शहरात पाडापाडीनंतर त्या त्या भागात विकास आराखड्यानुसार सर्व्हिस रोडची कामे करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेला किमान ११०० कोटी रुपये लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करून तो केंद्राकडे सादर केला. या शहर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या विकासाचे सादरीकरण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ७) दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु या शिष्टमंडळाची गडकरी यांच्यासोबत भेटच होऊ शकली नाही.
महापालिकेने केंद्रीय रस्ते विकास मंत्री निधी गडकरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते न भेटल्याने महापालिकेच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादरीकरण केले. यासोबतच आता महापालिका राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) यांच्याकडेदेखील सर्व्हिस रोडचा प्रस्ताव सादर करणार आहे. मुळात हे रस्ते त्यांच्याच अखत्यारित येतात. त्यामुळे महापालिका असा प्रस्ताव त्यांनाही देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.