Encroachment eradication campaign to be held on ten roads in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा श्वास मोकळा करण्यासाठी महापालिकेने ६ प्रमुख रस्त्यांवर मोहीम राबवून ६ हजार मालमत्ता जमीनदोस्त केल्या. त्यानंतर दसरा, दिवाळीपासून थांबलेली मोहीम आता पुन्हा सुरू होणार आहे. शहरातील १० रस्त्यांवर पाडापाडी होणार असून, हर्मूल रस्त्यावर अनाऊन्सिगचे आदेशही दिले आहेत.
तसेच क्रांती चौक ते पैठक गेटवर टोटल स्टेशन सव्र्व्हेला सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी महिनाभर पाडपाडीची धडक मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येणार आहे. शहर विकास आराखड्यातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने जून, जुलैमध्ये अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली. बीड बायपासच्या सातारा-देवळाईपासून या मोहिमेला सुरुवात झाली. या बीड बायपास रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडची जागा मोकळी करण्यात आली.
त्यानंतर लागलीच पथकाने मुकुंदवाडीतील खुनाच्या घटनेचा आधार घेत जालना रोडवर मोहीम राबवली. यात महावीर चौक ते चिकलठाणा पुढे केंब्रीज शाळा चौकादरम्यान दोन्ही बाजूंनी बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. यानंतर पैठण रोड, नगर नाका ते मिटमिटा रोड, जळगाव रोड, दिल्लीगेट ते हसूल टी पॉइंट या सहा रस्त्यांवरील सुमारे सहा हजार अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
या मोहिमेनंतर महापालिकेने शहरातील आणखी आठ रस्त्यांवर मोहीम राबविण्यासाठी टोटल स्टेशन सर्व्हे केला. त्यानंतर मार्किंग करून मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या. या नोटीस मिळाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने मोहीम थांबली होती. त्यात दसरा, दिवाळी सणोत्सवही आल्याने मोहीम थांबविण्यात आली होती, परंतु आता लवकरच मोहीम पुन्हा सुरू होणार आहे.
बुधवारपासून कारवाई
पडेगाव मुख्य रस्ता ते एमजीएम गोल्फ कोर्ट, हसूल टी पॉइंट ते समृध्दी लॉन्स, क्रांती चौक ते पैठणगेट या रस्त्यांवर अनुक्रमे बुधवार, गुरुवार, शुक्रवार अशा तीन दिवसांत रुंदीकरणाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.
रीतसर प्रक्रियेनंतरच कारवाई
महापालिकेकडून शहर विकास आराखड्यानुसार ज्या-ज्या रस्त्यांवर रुंदीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. ती मोहीम संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर राबविण्यात यावी, अशी सूचना महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार पहिले टोटल स्टेशन सर्व्हे केले जाईल. त्यानंतर मार्किंग करुन बाधितांना नोटीस बजावणार आहे.
या दहा रस्त्यांवर होणार मोहीम
पडेगाव-मिटमिटा मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्सपर्यंत (३० मीटर)
नगरनाका ते महापालिका हद्द (६० मीटर)
कांचनवाडी मुख्य रस्ता ते लॉ विद्यापीठ (३६ मीटर)
रेणूका माता कमान ते उमरीकर लॉन्स सातारा परिसर (१८ मीटर)
हर्सल टी पॉइंन्ट ते मनपा हद्द (६० मीटर)
सेव्हनहील चौक ते भाजीवाली बाई पुतळा (२४ मीटर)
महावीर चौक ते जळगाव टी पॉइंन्ट (व्हीआयपी रोड) (३५ मीटर)
चंपाचौक ते जालना रोड (तीन टप्प्यात) (३० मीटर)
क्रांतीचौक ते पैठणगेट (३० मीटर)
हसूल कारागृह ते अंबरहील (२४ मीटर)